महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार येणार! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कार्यकर्त्यांना ग्वाही

पुणे :- एका बाजूला विरोधी पक्ष पराजित होऊनही विजयाच्या अहंकाराने फुगला आहे, तर दुसरीकडे विजयी होऊनही भाजपाचे कार्यकर्ते काहीसे निराश आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिक जागांची अपेक्षा होती, पण ती कसर आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढण्यासाठी निस्वार्थपणे कामाला लागा,असे आवाहन भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या महाअधिवेशनाचा समारोप करताना केले.आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल,असेही शाह यांनी जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागा मिळाल्या, संपूर्ण इंडी आघाडीला एकत्रितपणेदेखील एवढ्या जागा मिळाल्या नाहीत. गेल्या तीन निवडणुकांतील सर्व जागा एकत्र केल्या तरी ही बेरीज एवढी होत नाही. देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा बहुमताचे सरकार बनविण्याचा जनादेश दिला आहे. पण आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा अधिक जागांची होती. अशा परिस्थितीत हताश होऊन चालत नाही, तर नव्या जोमाने कामाला लागावे लागते. ही वेळ याच वर्षात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढा, आणि राज्यात पुन्हा सत्ता आणा, हताश होऊ नका,महाराष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल सुनिश्चित असून आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात मिळेल व प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीनंतर राज्यात सरकार बनेल, हे माझे शब्द लिहून ठेवा, अशी विश्वासपूर्ण ग्वाहीदेखील शाह यांनी दिली.

विचारधारा हे आमच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून शाह म्हणाले की, या विचारधारेशी बांधील राहूनच गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केले. कलम 370 समाप्त करून काश्मीरला कायमचे भारतात समाविष्ट केले. वर्षानुवर्षांचा संघर्ष संपुष्टात आणून अयोध्येत रामलल्लाचे मंदिर बनविले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर नव्या अभिमानाने मोदी सरकारच्या काळात निर्माण झाला. समान नागरी कायदा आणण्याचे कामही मोदी सरकारकडूनच होणार असून देश त्याची प्रतीक्षा करत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील दहशतवाद, नक्षलवाद, समाप्त करून देशाला सुरक्षित केले. काही माध्यमसमूह खोट्या बातम्या देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तीस वर्षांसाठी देशात भाजपाचे सरकार देशात सत्तेवर असेल, हा आमचा विश्वास आहे. आपापसातील मतभेद समाप्त करून,स्वाभिमान जागृत ठेवून व विचारधारेवर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचे आहे. दीनदयाळजींनी दिलेल्या अंत्योदयाच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचे,गरीब कल्याणाचे काम मोदी सरकार करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

काँग्रेसकडून अपप्राचार सुरू आहे.गरीब,पददलित,आदीवासींचा कल्याण करण्याच्या खोटारडा दावा काँग्रेसवाले करत आहेत, पण पन्नास वर्षे सत्ता असताना काँग्रेसने गरीब कल्याणासाठी काय केले,असा सवालही अमित शाह यांनी केला. काँग्रेस व इंडी आघाडीचे नेते समाजात संभ्रम पसरवत आहेत, त्यामध्ये गुरफटू नका. आरक्षण संपविण्याच्या खोट्या प्रचारामुळे संभ्रम पसरला, आणि उत्तर देण्यात आपण कमी पडलो, याची कबुली देऊन ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षणाला बळ दिले. काँग्रेसने संविधान बदलण्याचा अपप्रचारही केला,पण मोदी सरकारने संविधानास सर्वश्रेष्ठ मानले आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठा आरक्षण मिळते, आणि जेव्हा शरद पवारांच्या आशीर्वादाने सरकार येते, तेव्हा आरक्षण समाप्त होते, असा थेट आरोपही शाह यांनी केला. शरद पवारांचे सरकार आले, तर मराठा आरक्षण गायब होईल, असा इशारा देत ते म्हणाले की, संभ्रम सोडा, समाजाच्या प्रत्येक घटकास भाजपानेच न्याय दिला आहे हे लक्षात ठेवा. शरद पवार हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा शिरोमणी आहे. या देशात भ्रष्टाचाराला संस्थात्मक प्रतिष्ठा देण्याचे काम शरद पवार यांनी केले, पण आता शरद पवारांचा खोटेपणा चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.घरोघरी जाऊन पवारांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला जाईल,संभ्रम पसरविण्याचे सारे प्रयत्न हाणून पाडले जातील. आता स्वार्थ सोडून प्रत्येक कार्यकर्ता पक्षाच्या विजयासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील युतीच्या प्रत्येक उमेदवारास विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांने संपूर्ण बळ पणाला लावावे, आणि 2014 पेक्षाही अधिक भव्य विजय मिळेल, यासाठी जबाबदारीने कामाला लागावे, असा आदेश त्यांनी दिला.

शरद पवार यांना जाहीर चर्चेचे आव्हान

शरद पवार यांच्याकडे हिंमत असेल तर केंद्रातील युपीए सरकारमध्ये मंत्री असताना महाराष्ट्राकरिता काय केले, याचा हिशेब देण्यासाठी त्यांनी पुण्याच्या कोणत्याही चौकात चर्चेसाठी यावे, आमचे मुरलीधर मोहोळ त्याचा संपूर्ण हिशेब जनतेसमोर मांडतील, असे आव्हानही त्यांनी दिले. महाराष्ट्राकरिता मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची संपूर्ण यादीच शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली. पवार यांनी कृषीमंत्री असूनही दहा वर्षांत साखर कारखान्यांच्या इन्कम टॅक्सचा प्रश्नदेखील सोडविला नाही, तो मोदी यांनी चुटकीसरशी सोडविला, असे ते म्हणाले.

राहुल गांधींचा खटाखट खोटारडेपणा!

देशाने राहुल गांधींच्या खटाखट आश्वासनावर विश्वास ठेवला नाहीच, पण ज्या राज्यांत त्यांची सरकारे आहेत, तेथे तरी त्यांनी खटाखट पैसे द्यावेत, असे आव्हानही त्यांनी दिले. तेलंगणा, कर्नाटक हिमाचलातील एक तृतीयांश आश्वासनेही त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. मोदी सरकारने आपले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात विकासाचे महामार्ग उभे केले. अनेक महत्वाकांक्षी योजना पूर्ण केल्या. 2014 ते 2019 हा फडणवीस यांचा सत्तेचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाने नोंदला जाईल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

औरंगजेब फॅन्स क्लबचे उबाठा अध्यक्ष

बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या काँग्रेसने त्यांचा जेवढा अपमान केला,तेवढा ब्रिटिशांनीही केला नव्हता. भाजपा सरकारने बाबासाहेबांचा सन्मान केला. मोदी सरकारने देशाची सुरक्षा सुनिश्चित केली, नक्षलवादाची पाळेमुळे खणून दोन वर्षांत हा देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. औरंगजेब फॅन क्लबकडून देश सुरक्षित राहणार नाही. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीवर बसून स्वतःस बाळासाहेबांचा वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे यांचीही खिल्ली उडविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

FORGING A SELF-RELIANT FUTURE: NADP AND IIIT NAGPUR JOIN FORCES

Mon Jul 22 , 2024
Nagpur :- National Academy of Defence Production (NADP), Nagpur, and Indian Institute of Information Technology (IIIT), Nagpur, have signed a Memorandum of Understanding (MoU) aimed at revolutionizing the defence sector with cutting-edge technological innovations supported by IT and Electronics Systems. The MoU is anchored in the vision of supporting the AtmaNirbhar Bharat initiative by establishing a collaborative framework that enhances […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com