मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

आत्मनिर्भर भारतासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यापीठांनी खऱ्या अर्थाने विश्व विद्यालय व्हावे

मुंबई :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर देशाचा अमृतकाळ सुरु झाला आहे. देशात मातृशक्तीचे पुनर्जागरण होत आहे. विद्यापीठांमधून अधिकाधिक विद्यार्थिनी सुवर्ण पदके प्राप्त करीत आहेत तसेच आयएएस सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उत्तीर्ण होत आहे. उज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महिला विद्यापीठ तसेच महिला महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. 

एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विले पार्ले मुंबई येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (३ डिसेंबर) संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी मंत्री अमरीश पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, मुंबई पोस्टल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिमाद्री नानावटी, प्राचार्या डॉ. राजश्री त्रिवेदी, विश्वस्त अपूर्व नानावटी तसेच महाविद्यालयाचे शुभचिंतक, माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक उपस्थित होते.   

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत कला क्षेत्रात शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होऊन ते परिपूर्ण नागरिक होतील असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांनी केवळ आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित न राहता देशविदेशातील संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून खऱ्या अर्थाने विश्वविद्यालय व्हावे असे राज्यपालांनी सांगितले.

पूर्वी जगभरातील लोक भारतातील नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी येत. चिनी प्रवासी हुआन त्सांग यांनी भारतात अध्ययन करून चिनी तसेच तिबेटी भाषेत ग्रंथ निर्मिती केली. भारतातून बुद्ध धर्म चीन, जपान, मंगोलिया, थायलंड आदी देशांमध्ये गेला. आज सर्व गोष्टी अनुकूल असताना आपण पुनश्च असा भारत निर्माण करू शकतो का याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 

पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे 

महर्षी कर्वे यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ केवळ पाच मुलींसह सुरु झाले व आज त्याचा ७ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. महिला विद्यापीठ लवकरच पालघर व चंद्रपूर याठिकाणी आपली उपकेंद्रे सुरु करणार असल्याची माहिती कुलगुरु उज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली.

यावेळी डाक विभागातर्फे महाविद्यालयावर विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनीं गणेश वंदन, सरस्वती वंदन व नृत्य सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Koshyari presides over Golden Jubilee Celebrations of Maniben Nanavati Women's College

Mon Dec 5 , 2022
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presided over the Golden Jubilee Celebrations of the Maniben Nanavati Women’s College, affiliated to SNDT Women’s University at the College Auditorium at Vile Parle Mumbai on Sat (3 Dec). The Governor released a Special Postal Cover brought out by India Posts to mark the occasion. Speaking on the occasion, the Governor called upon […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com