आंतरराज्य पूर व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या बैठकीत दिल्या सूचना
नागपूर :- संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी मध्यप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र या तीन राज्यांच्या केंद्रीय जल आयोग, जलसंपदा विभाग व महसूल प्राधिकरणाच्या यंत्रणांनी आपसी समन्वयाने काम करावे व पुराच्या काळात जीवित व वित्तहानी टाळण्याला सर्वतोपरी प्राधाण्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.
आंतरराज्य पूर व्यवस्थापन आणि समन्वय समितीची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आयुक्त बिदरी बोलत होत्या. जलसंपदाचे मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, गोसेखुर्द चे मुख्य अभियंता ए.टी. देवगडे, केंद्रीय जल आयोगाचे अधिक्षक अभियंता सहारे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता पी.एन. पाटील, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता आर.जी.पराते (भंडारा), आर.जी.कुरूडकर (गोंदिया), नागपूर विभागाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश भांबोरे, मंगेश त्रिफळे, तसेच दुरदृष्य प्रणालीद्वारे जबलपूर चे विभागीय आयुक्त अभय वर्मा, मध्य प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
पूर परिस्थितीचे निरीक्षण करताना सर्व जिल्ह्यांनी योग्य प्रकारे आपसी संवाद साधावा. धरणातून पाणी सोडण्यापुर्वी सर्व राज्यांनी लगतच्या जिल्ह्यांना पुर्वसूचना द्यावी. सर्व धरणे व जलाशयातील पाण्याच्या पातळीबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविण्याच्या सूचना यावेळी आयुक्त बिदरी यांनी दिल्या.
मध्य प्रदेशातील संजय सरोवर, चौराई धरण तसेच पेंच, वैनगंगा व प्राणहिता या नद्या व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवण्याचे तसेच मध्य प्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या भागात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी योग्य दक्षता घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.