भावी काळ हा व्यक्तीपेक्षा सौहार्द-सहकार्याने राहणाऱ्या समुहाचा – माता अमृतानंदमयी देवी

Ø नागपुरात सी-20 परिषदेच्या प्रारंभिक सत्रांना सुरुवात

Ø जगातील 26 राष्ट्रांचे 357 प्रतिनिधी सहभागी

Ø नागरी संस्थांनी दुर्लक्षितांचा आवाज व्हावे- डॉ. सत्यार्थी

Ø नागरी समाजाची भक्कम प्रणाली असण्याची गरज –फडणवीस

नागपूर :- भावी काळ हा कोणा एका व्यक्तीचा राहणार नसून सहकार्य आणि सामंजस्याने राहणाऱ्या समुहाचा असेल. त्यासाठी प्रत्येकाने समावेशकतेच्या सार्वत्रिक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे प्रतिपादन सी-20 इंडिया परिषदेच्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी देवी यांनी आज येथे केले. सी-20 परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

नोबेल पारितोषिक विजेते आणि सत्यार्थी फाऊंडेशनचे संस्थापक कैलाश सत्यार्थी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सी-20 चे शेर्पा तथा भारताचे माजी राजदूत विजय नंबियार, सी-20 चे ट्रॉयका सदस्य आणि ब्राझिलमधील गेस्टोसच्या अलेक्झांड्रा निलो, इंडोनेशियाचे अहमद माफतुचन, सी-20 सचिवालयाचे संरक्षक डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांचा प्रमुख पाहुण्यांमध्ये समावेश होता.

माता अमृतानंदमयी देवी म्हणाल्या, की सध्याच्या काळात मानवतेपुढे मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत प्रश्न समजून घेण्याचे शहाणपण आणि ते सोडविण्याची मानसिकता अशा दोन गोष्टींची मानव जातीला प्रकर्षाने गरज आहे. कोरोना काळ हा कसोटीचा कालखंड होता. त्यात आपण भविष्यात काही सुधारणा करण्याचा संकल्पही केला, मात्र असे संकल्प फार काळ टिकत नाही. लोक आपल्या मुळ सवयींकडे परत वळतात. या पार्श्वभूमीवर भविष्यकाळ हा व्यक्तीपेक्षा समष्टीचा असेल. विभाजित समाजाऐवजी सौहार्द आणि सहकार्याने राहणाऱ्या सर्वसमावेशक समाजाचाच तो असणार आहे. हा निसर्गाने मानव जातीला दिलेला इशारा आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाशी जोडले जातांना आपण निसर्गापासून दुरावत चाललो आहोत.आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही, त्यामुळे समावेशकता अवलंबण्याची गरज आहे. पर्यावरणाचे संवर्धन करतांनाच आपल्या मानसिकतेतही बदल घडविण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी विशद केल्या.

सध्याचे जग हे दोन प्रकारच्या दारिद्रयाचा सामना करीत आहे. अन्न, वस्र आणि निवाऱ्याच्या गरीबीसह प्रेम आणि करूणेचेही दारिद्रय जगाला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक मूल्यसंस्काराची आधुनिक काळात मोठी गरज आहे. भारत ही अध्यात्माची भूमी असून भारतीय भूमीने दिलेला ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मंत्र जगाच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यास प्रेरणादायी आहे. सी-20 परिषदेच्या माध्यमातून त्याचा प्रसार करूया. विविधतेची निकोप सरमिसळ मानवी संस्कृतीची भरभराट होण्यासाठी अतिशय गरजेची आहे, असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मोठी प्रगती केली आहे. त्यातून मोठे परिवर्तन घडवले जात आहे, असे गौरवोद्गारही अमृतानंदमयी देवी यांनी काढले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी-20 चे लोकशाहीकरण झाले आहे, असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही परिषद आता एक लोकचळवळ बनली आहे. त्यात जगातील सर्व स्तरातील नागरिक आणि त्यांच्याशी संबंधित विविध मुद्दे समाविष्ट झाले आहेत. ती केवळ ‘बोर्ड रूम डिस्कशन’ होणारी परिषद राहिली नसून सर्व घटकांचे व्यापक प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकाभिमुख चर्चेचे केंद्र बनले आहे. कोणत्याही देशांमध्ये नागरी संस्थांचे स्थान महत्वपुर्ण असण्यासोबतच त्यांचे सक्रीय योगदान असले पाहिजे. यामुळे सामान्य माणसांच्या मनातल्या विचारांचे प्रतिबिंब राजकीय तसेच अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या स्तरावर उमटत राहते. समस्यांचे, समाधानाचे प्रतिबिंब उमटणे केवळ नागरी संस्थांमुळे शक्य आहे. शेवटच्या घटकातील माणसाच्या अधिकाराचे न्याय रक्षण सर्वात महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

जागतिकीकरणानंतर आम्ही अतिशय जवळ आलेलो आहोत. परंतु आमच्या समस्यांचे ध्रुवीकरण वेगळ्या पद्धतीने झाले आहे. त्यामुळे आमच्या जागतिकरणाची दिशा ही एका दिशेने आणि एका सूत्रात योग्य असावी, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हाच ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात विश्व म्हणजे एक कुटुंब या संकल्पनेला अधिष्ठान येईल. सरकारकडे कायदेशीर अधिकार असतात मात्र नागरी समाजाकडे नैतिक अधिकार असल्याने नागरी समाजाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नागरी समाजाची एक भक्कम प्रणाली असण्याची गरज आहे, जेणेकरून शेवटच्या माणसाचा आवाज सरकार ऐकू शकेल, असे त्यांनी यावेळी आग्रहाने सांगितले.

या परिषदेला 26 देशांचे 357 प्रतिनिधी उपस्थित असल्याची माहिती डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. सी-20 प्रारंभिक बैठकीसाठी 130 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी नागपुरात आले आहेत. यावेळी सहस्रबुद्धे यांनी सी-20 सचिवालयाच्या कार्याचा अहवाल सादर केला. सहभागी सदस्यांचे स्वागत करताना विजय नांबियार म्हणाले की, सी-20 प्रारंभिक परिषद ही नागरी समाजाला एकत्र आणण्यासाठीची एक बैठक आहे. नागरी संस्था शासनाचा भक्कम आधार आहेत, आणि यापुढेही राहतील. नागरी संस्था सर्व अडथळे पार करून काम करू शकतात तसेच सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जगातील नागरी संस्थांनी दुर्लक्षितांचा आवाज व्हावे- डॉ. सत्यार्थी

डॉ. कैलाश सत्यार्थी म्हणाले की, जी-20 अध्यक्षतेअंतर्गत भारताने दक्षिणेकडील देशांच्या अधिक प्रभावी प्रतिनिधित्वासाठी आवाज उठवला पाहिजे. तसेच जगात करुणेची भावना रुजावी यासाठी देखील नेतृत्व केले पाहिजे. जगात विविध क्षेत्रात नागरी संस्थांमध्ये भिन्न उद्देशांनी स्पर्धात्मकरित्या कार्य सुरु आहे. मात्र, दुर्बल उपेक्षित घटकांचा आवाज अजूनही जोरकसपणे मांडण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत नाही. सी-20 मध्ये या दुर्लक्षित घटकांचा आवाज मांडण्यासाठी जगातील नागरी संस्थांनी वसुधैव कुटुंबकम अर्थात जग एक कुटुंब आहे या भावनेतून पुढाकार घ्यावा. दुर्लक्षितांसाठी नागरी संस्थांनी जागतिक स्तरावर कार्य करावे.

बालकांचे अधिकार, आरोग्य, शिक्षण, स्त्री-पुरुष समानता अशा महत्वाच्या विषयांवरही चर्चा करून जागतिक स्तरावर नागरी संस्थांनी उत्तम कार्य करावे. मध्यान्ह भोजन, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी महत्वाच्या योजना भारतात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सामाजिक सुरक्षिततेचे जगातील हे सर्वोत्तम कार्यक्रम असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. सुंदर जग घडविण्यासाठी नागरी संस्थांनी हातात-हात घेऊन ‘वसुधैव कुटुंबकम’ मंत्र प्रत्यक्षात आणत कार्य करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

अहमद मफ्तुचान यांनी नागपुरात प्रारंभिक बैठक आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. नागरी संस्थांच्या नेत्यांनी जी-20 बरोबर त्यांचा सहभाग अधिक मजबूत करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. आजच्या जगात नागरी संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आधुनिक समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सी-20 अथक प्रयत्न करत आहे, असे अलेक्झांड्रा निलो म्हणाल्या. यावेळी विविध नागरी संस्थांकडून मागविण्यात आलेल्या सुचनांचे ‘व्हॉईस ऑफ नागपूर’ हे संकलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माता अमृतानंदमयीदेवी यांच्याकडे सोपविले.

सी-20 चे उप-शेर्पा स्वदेश सिंग यांनी आभार मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

G - 20 की तैयारियों में गरीबों पर अत्याचार

Tue Mar 21 , 2023
– गरीबों पर मनपा द्वारा अत्याचार होने का ट्वीट पूर्व महापौर संदीप जोशी ने किया नागपुर :- शहर में हो रही जी20 की बैठक के लिए मनपा पर सौंदर्यीकरण की जिम्मेदारी सौंपी गई थी, इसलिए जी 20 सदस्य देशों के प्रतिनिधियों के आवाजाही वाले मार्ग पर न केवल सौंदर्यीकरण किया गया बल्कि ऐसे मार्गों के फुटपाथ या सड़क किनारे के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com