– पाण्यातून हायड्रोजन काढून इंधनात रूपांतर
– भारतीय रेल्वेत वैज्ञानिक क्रांती
– कालका-सिमला नॅरोगेज मार्गावर धावणार
नागपूर :-भारतीय रेल्वेने बरीच प्रगती केली. सुरुवातीला वाफेवर चालणारे इंजिन डिझेलवर चालू लागले. तंत्रज्ञानात प्रगती झाल्यानंतर सध्या विजेवर रेल्वे गाड्या चालत आहेत. आता ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने क्रांती केल्यानंतर चक्क हायड्रोजनवर रेल्वे गाडी चालविण्यात येणार आहे. म्हणजे पाण्यातून हायड्रोजन वेगळे करून त्याचा इंधन म्हणून वापर केला जाईल. हायड्रोजन इंधनावर रेल्वे चालविण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केलेल्या कालका-सिमला या नॅरोगेज मार्गावर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन चालविण्यात येणार आहे. हा रेल्वे मार्ग 9 नोव्हेंबर 1903 रोजी सुरू झाला असून मार्गावर 103 बोगदे आहेत; ज्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुुणीत होतो. कालका स्टेशन हरयाणात आहे. त्यानंतर ही ट्रेन हिमाचलमध्ये प्रवेश करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने देशात क्रांती केली. हायड्रोजनवर रेल्वे गाडी चालविण्याची योजना आखली. केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणाही केली. यासंदर्भात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांनी हायड्रोजन ट्रेनबद्दल माहिती दिली.
रेल्वे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरपर्यंत कालका-सिमला मार्गावर हायड्रोजन ट्रेन चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कालका-सिमला स्थानके हायड्रोजन इंधन स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत. पाण्यातून हायड्रोजन काढून त्याचे इंधनात रूपांतर करण्यासाठी या स्थानकांवर प्लांट उभारण्यात येतील. याबाबत संबंधित अधिकार्यांनी कालका-सिमला रेल्वे विभागाचे सर्वेक्षण केले आहे. हायड्रोजन हे प्रदूषणविरहित स्वच्छ इंधन मानले जाते. हायड्रोजन इंधनाच्या वापरामुळे हानिकारक वायूंचे शून्य उत्सर्जन होते आणि फक्त पाण्याची वाफ होते; जी हवेसाठी पर्यावरणास अनुकूल मानली जाते. पहिल्या टप्प्यात हायड्रोजन ट्रेन फक्त नॅरोगेज ट्रॅकवर चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हायड्रोजन हे प्रदूषणविरहित स्वच्छ इंधन
जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनीत चालली. नंतर चीनमध्ये, आता भारतात डिसेंबरअखेर चालविण्याचे लक्ष्य आहे. ही गाडी भारतात तयार झाली असून या गाडीचा आवाज इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी असेल. ही गाडी प्रतितास 140 किमी गतीने हजार किमीपर्यंत धावू शकते. विजेच्या तुलनेत ही ट्रेन वेगात धावणार. इंधन आणि तिचा देखभाल खर्च कमी असेल. एकदा इंधन भरले की जवळपास सलग 200 तास धावू शकेल.