संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतिची अंतिम मतदार यादी काल 25 ऑगस्ट ला प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशान्वये पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील बिडगाव,नेरी,गारला,नान्हा मांगली, वारेगाव, उमरी, कवठा, चिकना,बाबूलखेडा,चिखली या 11 ग्रामपंचायतीत 21 जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला,नामाप्र,नामाप्र महिला, व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सदर सोडती नंतर संबंधित ग्रामपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली.
या प्रारूप प्रभाग रचनेवर 3 जुलै पर्यंत आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.दरम्यान 3 जुलै पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे.7 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी हे प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देतील.12 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता तर 14 जुलै ला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात आली होती.
त्यानंतर राज्य निवडणूक आयोगचे प्रधान सचिव के सुर्यकृष्णमूर्ती यांच्या आदेशानव्ये जाहीर मतदार यादी कार्यक्रमानुसार कामठी तहसील कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने 10 ऑगस्ट ला प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यावर 21 ऑगस्ट पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या त्यानंतर शुक्रवार 25 ऑगस्ट ला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.
जाहीर अंतिम मतदार यादीनुसार पंचवार्षिक मुदत संपलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीत एकुण मतदारांची संख्या 27 हजार 402 असून यामध्ये 14 हजार 291 पुरुष तर 13 हजार 111 स्त्री मतदारांचा समावेश आहे.तर या 11 ग्रामपंचायत निवडणुकीची आचार संहिता केव्हा लागू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.