बसपा पदाधिकारी महा मेट्रोरेल चे ब्रजेश दिक्षीत ह्यांना भेटले, चुकांची दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरु : बसपा

नागपूर :- कामठी रोडवरील कांशीराम टी पॉइंट व कांशीराम मार्गावरील स्टेशनला मान्यवर कांशीराम चे नाव देऊन मेट्रो व्यवस्थापनाने केलेली चूक दुरुस्त करावी, असे न झाल्यास बसपा मेट्रो विरोधात उग्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी बसपा नेत्यांनी मेट्रोरेल चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांना भेटून निवेदनाद्वारे दिला.

नागपुरात 2016 पासून महामेट्रो च्या कामाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र शासन, महामेट्रो रेल कार्पोरेशन व मनपा च्या वतीने निश्चित करण्यात आले की ज्या चौकाला, मार्गाला किंवा स्थळाला जे प्रचलित नाव आहे ते नाव मेट्रो स्टेशनला देण्यात येईल.

परंतु कामठी रोडवरील ज्या मार्गाला मान्यवर कांशीराम मार्ग व मान्यवर कांशीराम टी पॉईंट असे नाव नागपूर मनपाद्वारे 2014 ला अधिकृतरित्या एकमताने ठराव पास करून देण्यात आले ते नाव मात्र येथे बनलेल्या मेट्रो स्टेशनला न देता संबंध नसलेले नारीरोड हे नाव देण्याची प्रक्रिया दिसताच बसपाने 15 फेब्रुवारी 21 व 24 फेब्रुवारी 22 रोजी निवेदने देऊन कांशीरामजींच्या नावाची दुरुस्ती सुचविली. परंतु नेहमीप्रमाणे महामेट्रोने व महाराष्ट्र शासनाने ह्यांकडे हेतुत: दुर्लक्ष केल्याने बसपा नेते संतापले.

यापूर्वी बसपा नेत्यांनी वर्धा रोडवरील रहाटे चौकातील स्टेशनला दीक्षाभूमी, विमानतळ परिसरातील स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो स्टेशन, कस्तुरचंद पार्कवरील स्टेशनला संविधान चौक स्टेशन, अंबाझरी येथील स्टेशनला लहुजी साळवे उद्यान स्टेशन तसेच सीए रोडवरील डॉ. आंबेडकर चौकातील स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेट्रो स्टेशन आदि नावांच्या सूचना व दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत.

नागपुरातील झिरो माइल येथे असलेल्या स्टेशनला व आणखी एका स्टेशनला मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या शिफारसी ने यापूर्वी विना विलंब 2 नावात बदल केलेला आहे. परंतु त्या पूर्वीपासून असलेल्या बसपाच्या निवेदनावर मात्र विचार झालेला नाही. त्यामुळे बसपाने महामेट्रो रेल कार्पोरेशन वर जातीयवादी भावनेतून हेतू पुरस्सर महापुरुषांची नावे टाळण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. 6 डिसेंबर पर्यंत जर या चुकांची दुरुस्ती व नवीन नामांतर केले नाही तर बसपा महामेट्रो रेल कार्पोरेशन व महाराष्ट्र शासन च्या विरोधात रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा याप्रसंगी बसपा नेत्यांनी मेट्रो च्या अधिकाऱ्यांना दिला.

बसपाच्या या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी एड. सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव व विदर्भ प्रदेशचे संयोजक पृथ्वीराज शेंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे व माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com