469 मोहल्ले सहभागी : सहभागी मोहल्ल्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@2025 यांच्यावतीने आयोजित स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या तिस-या व अंतिम टप्प्याचे मुल्यांकन पूर्ण करण्यात आले असून लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये शहरातील 469 मोहल्ले सहभागी झाले आहेत.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लवकच स्वच्छ सर्वेक्षणची टीम नागपुरात येणार आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी त्यात सहभाग घेऊन आपला मोहल्ला स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यामध्ये स्वच्छ मोहल्ला स्पर्धेची सुरूवात झाली असून यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सहभागी मोहल्ल्यांचे निरिक्षण करणे सुरू आहे. यामध्ये मोहल्ल्यातील कचरा संकलन केंद्र, कचरा वर्गीकरण, रस्त्यांची स्वच्छता, उद्यानांची स्वच्छता, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक मुत्रीघर, स्वच्छताअॅप डाऊनलोड करणाऱ्याची संख्या, कम्पोस्टिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या या मुख्य बाबींवर मुल्यांकन करण्यात आले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधत त्यांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे.
स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या सहभागी मोहल्ल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोहल्ल्यातील नागरिकांनी स्वच्छतेबद्दल जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांसमवेत मोहल्ल्यातील स्वच्छता निरीक्षक, जमादार, स्वच्छता कर्मचारी या मोहल्ल्यांमध्ये विशेष लक्ष देऊन कामे करीत आहेत. मोहल्ल्यांच्या प्रगतीनुसार मोहल्ल्यांना तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. पहिल्या टप्प्यात ‘अ’ श्रेणीमध्ये 26, ‘ब’ श्रेणीमध्ये 373 तर ‘क’ श्रेणी 70 मोहल्ले होते. दुसऱ्या टप्प्यात ‘अ’ श्रेणीमध्ये 56, ‘ब’ श्रेणीमध्ये 362, तर ‘क’ श्रेणीमध्ये 51 मोहल्ले समाविष्ठ आहेत.
मोहल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 25 लाखांची विकास कामे, दुसऱ्या क्रमांकाच्या पाच मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 10 लाखांची कामे, तिसऱ्या क्रमांकाच्या सात मोहल्ल्यांमध्ये प्रत्येकी 5 लाखांची विकास कामे नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या मोहोल्यातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत असल्याबाबत मनपातर्फे आभार मानले आहे.