निळ्या झेंड्याचा वाद पोहोचला पोलीस दरबारी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 30:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव , जेतवन बौद्ध विहाराच्या मागील जागेत असलेल्या निळ्या झेंड्याचा वादग्रस्त विषय हा सामंजस्य अभावी स्थानिक तहसील प्रशासनासह पोलीस दरबारी पोहोचला आहे. उल्लेखनीय आहे की मागील वर्षी याच परिसर लगत असलेल्या एका जागेच्या वाद हा विकोपाला गेल्याने एका गटाने दुसऱ्या गटातील व्यक्तीच्या डोळ्यावर मारहाण करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती तेव्हा या निळ्या झेंड्याच्या वादात स्थानिक प्रशासन न्यायिक भूमिका घेत नसल्याने अश्याच प्राणघातक घटनेची पुनरावृत्ती तर होणार नाही ना!अशी भीती परिसरात व्यक्त केली जात आहे.
महसुल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सन 1942 मध्ये कामठी च्या गाडेघाट नदीला आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या छावणी तसेच जुनी खलाशी लाईन च्या नागरिकांना पुनर्वसित करण्यासाठी बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे तसेच दिवंगत हेमराज खांडेकर, गुलाबराव खोब्रागडे, तुळशीराम मेश्राम , तसेच चरनदास बहादूरे यांनी न्यायिक लढा देत छावणी तसेच जुनी खलाशी लाईन च्या नुकसानग्रस्त नागरिकांना रहिवासी प्रयोजनार्थ प्रॉपर्टी कार्ड नुसार मालकी जागा देण्यात यश गाठले होते. त्यानुसार छावणी तसेच खलाशी लाईन कामठी च्या काही नुकसानग्रस्त नागरीकाना पुनर्वसन भावनेतून प्लॉट देत मालकी हक्क देण्यात आला होता. यानुसार जुनी खलाशी लाईन मोदी पडावं रहिवासी दासा संपत वासनिक यांच्या जागेच्या ताब्यात असलेला निळा झेंडा हा घराच्या बांधकामात अडथळा ठरत असून वादग्रस्त विषय निर्माण झाला असून हा वाद न्यायालयीन दारापासून ते तहसील तसेच पोलीस स्टेशन पर्यंतच्या दारात पोहोचले आहे मात्र यातील मार्ग मोकळा न झाल्याने हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी ने 26 जून 1970 ला पुनर्वसित असलेल्या नागरिकांना केलेल्या जागा वाटपानुसार नझुल शीट क्र सहा,संवर्ग 59-एल/129 ,प्लॉट क्र 26 हा जाहीर लिलाव करून 89.2(959.792 चौरस मीटर)क्षेत्रफळ जागेचा मोदी पडावं रहिवासी दासा संपत वासनिक यांच्या नावाने देण्यात आला होता.मात्र या जागेवर तेव्हापासून कुठलेही बांधकाम करण्यात आले नसून मोकळी जागा होती. कालांतराने 16 डिसेंबर 2010 ला प्लॉट मालक दासा संपत मरण पावल्याने हा प्लॉट दसमाबाई दासा वासनिक यांच्या नावाने करीत त्यांच्या कुटुंबियातील सदस्य असलेले प्रेमा दासा वासनिक, प्रमोद दासा वासनिक, पंकज दासा वासनिक , अशोक दासा वासनिक तसेच प्रमिला पुनमचंद गजभिये यांच्या नावांची वारसान नोंद करण्यात आली होती. तर या प्लॉट वर काही वर्षांपूर्वी एक निळा झेंडा उभारल्या गेला असून हा झेंडा या प्लॉट च्या जागेत येत असल्याने संबंधित प्लॉटमालकाने 5 मे 2022 ला पोलीस बंदोबस्तात प्लॉट च्या जागेची मोजणी करून घेतली त्यानुसार सदर जागेच्या आत नागरीकानी उभारणी केलेला निळा झेंडा येत असून आता हा झेंडा बाहेर काढायचा की त्याची त्याच जागेत जपणूक करायची, की नागरिकांसाठी मोकळे करायचे असा मोठा प्रश्न प्लॉटमालकाला पडला असून ही जागा समाजभवणासाठी आरक्षित असून हा प्लॉट यांचा नाही असा दावा करीत जेतवन बुद्ध विहाराच्या लगत रहिवासी असलेले सुरेश गजभिये यांनी कामठी च्या दिवाणी फौजदारी न्यायालयात 25 एप्रिल 2022 ला प्लॉटवरील ताब्यावर स्थगिती मिळविण्यासाठी धाव घेतली होती मात्र सहा मे ला न्यायाधीश एस एस गाढवे यांनी अर्जदार सुरेश गजभिये यांनी केलेली मागणी फेटाळून लावत स्थगितीचा अर्ज रद्द केला तसेच तहसील प्रशासनाने सुद्धा ह्या स्थगितीच्या अर्जाला दुजोरा दिला नाही.तर यात प्लॉटमालक यांना आजारपणामुळे न्यायालयीन दरबार तसेच प्रशासकीय पायऱ्या चढण्यात होत असलेला त्रास लक्षात घेता प्लॉटमालक दसमाबाई दासा वासनिक यांनी 3 जानेवारी 2022 ला महेंद्र डोमाजी वाघमारे यांना आंममुखत्यार पत्र लिहून दिले असून या प्लॉट संदर्भात प्लॉटमालकाचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र वाघमारे पुढाकार घेत आहेत.या जागेच्या ताब्यावर आक्षेप घेणारे आक्षेपकर्ते सुरेश गजभिये यांनी सदर जागा दासा वासनिक यांना प्रशासनाने दिलेली नसून ती जागा समाजभवणासाठी आरक्षित आहे असे पुरावे प्रशासनासमोर सादर करावे त्यावरून योग्य तो मार्ग काढता येईल अशी समज तहसील प्रशासनाकडे झालेंल्या सूनावणीतून करण्यात आले आहे.तर 22 मे ला प्लॉट संबंधितांनी सदर झेंड्याचा अपमान करीत असल्याची तक्रार जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिल्यावरून पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी दुसऱ्या दिवशी प्लॉटसंबंधित तसेच आक्षेपकर्त्याना पोलीस स्टेशन ला बोलावून 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच या जागेवर सुरू असलेले बांधकाम हे थांबविण्यात यावे यासाठी मोदी पडावं कामठी येथील शील तरुण उत्साही बहुउद्देशीय मंडळ कामठी तसेच महेंद्र रामचंद्र चांदूरकर यांनी नगर परिषद ला केलेल्या तक्रारीवरून या प्लॉट वरील बांधकाम थांबविण्यात आले आहे.
सदर प्लॉट मध्ये असलेला निळा झेंडा कुणी व केव्हा उभारला हे अजूनही अनुत्तरीत आहे तसेच कायद्यानुसार या झेंडा समितीच्या पदाधिकाऱ्यावर या झेंड्याचा सुरक्षिततेची जवाबदारी आहे तेव्हा या झेंडा समितीचे पदाधिकारी व सदस्य कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे तसेच हा वाद एकाच समाजातील लोकांचा असमजुती चा वाद आहे यात सामंजस्याने मार्ग मोकळा करून वाद संपुष्टात आणावा किंवा स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर न्यायिक भूमिका घेऊन वादाचा निराकरण करावा अन्यथा या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भाजप चे मुख्याधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन सादर

Mon May 30 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 30 – भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष कामठी शहर विक्की बोंबले यांच्या नेतृत्वात प्रबुद्ध नगर प्रवेशद्वार नया गोदाम कामठी येथील अतिक्रमणाबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना आज दुपारी निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी महामंत्री महेंद्र वंजारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com