राज्यपालांच्या हस्ते हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उदघाटन संपन्न

मुंबईतील समुद्राचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर व्हावा : राज्यपाल रमेश बैस

समुद्री व्यापार क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी : राजीव जलोटा

मुंबई :- मुंबईला समुद्र किनारा लाभला असला तरी देखील समुद्राचा जलवाहतुकीसाठी पुरेसा उपयोग झाला नाही. या दृष्टीने माल वाहतूक आणि प्रवाश्यांची वाहतूक या दोन्हीकरिता जल परिवहन सेवा सुरु करण्याबद्दल शक्यतांची तपासणी केली जावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.

राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ३१) राज्यातील राष्ट्रीय नौवहन सप्ताह आणि हीरक महोत्सवी राष्ट्रीय नौवहन दिनाचे उदघाटन राजभवन, मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

जगभरातील विविध व्यापारी जहाजांचे संचलन करणाऱ्या भारतीय नाविकांची संख्या ५.६१ लाख इतकी असून जगातील नाविकांच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्के इतके असले तरी देखील या क्षेत्रात रोजगाराची संख्या आणखी वाढावी व त्याकरिता सागरी प्रशिक्षण संस्था वाढवाव्यात तसेच सुरु असलेल्या प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण केले जावे, असे राज्यपालांनी सांगितले. 

शेजारी देशांच्या अर्थव्यवस्था संकटात असताना भारतीय अर्थव्यवस्था मजबूत पायांवर उभी असून समुद्री व्यापार क्षेत्र देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने योगदान देईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

समुद्री व्यापार क्षेत्रात महिलांना रोजगाराच्या संधी : राजीव जलोटा 

जगभरातील नाविकांपैकी १२ टक्के नाविक भारतीय असून सन २०३० पर्यंत हे प्रमाण २० टक्के इतके वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याचे नौवहन महासंचालनालयाचे महासंचालक तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष व राष्ट्रीय नौवहन दिवस उत्सव केंद्रीय समितीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी यावेळी सांगितले.

भारतीय नौवहन क्षेत्रात महिलांचे प्रमाण वाढत असून आजच्या घडीला ३३२७ महिला जहाज कर्मचारी म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे जलोटा यांनी सांगितले.

देशभरात सागरी प्रशिक्षण देणाऱ्या १५६ संस्था असून त्या देशातील नाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय नौवहन दिनानिमित्त जलोटा यांनी राज्यपालांच्या जॅकेटवर राष्ट्रीय नौवहन दिवसाचे पदक लावले तसेच त्यांना नौवहन व्यापाराचे स्मृतिचिन्ह भेट दिले.

कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक कुमार संजय बरियार, उपमहासंचालक डॉ. पाडूरंग राऊत, भारतीय नौवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी के त्यागी, संचालक व राष्ट्रीय नौवहन दिवस उत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल उबाळे, शिपीग मास्टर मुकुल दत्ता तसेच जहाज व्यापार संबधी विविध संस्थाचे आणि नाविक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'स्वच्छता मशाल मार्च' मध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वच्छ, सुंदर, स्वस्थ नागपूरसाठी जनजागृती

Sat Apr 1 , 2023
– दिल्लीच्या कार्यक्रमात मनपाचे कौतूक नागपूर :- स्वच्छोत्सव-२०२३ अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे काढण्यात आलेल्या ‘स्वच्छ यात्रा’ व ‘स्वच्छ मशाल मार्च’ला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शुक्रवारी (ता.३१) सकाळी संविधान चौकातून निघालेल्या या मशाल मार्चमध्ये मनपाच्या स्वच्छता कर्मचारी महिलांसह शहरातील विविध बचत गटांच्या महिलांनी सहभाग नोंदविला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com