– स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी मनपा इमारत तसेच परिसराची आकस्मिक पाहणी केली. त्यांनी मनपा मुख्यालयातील जुनी आणि नवीन इमारतीमधील विविध कार्यालय तसेच संपूर्ण परिसराचे निरिक्षण केले.
याप्रसंगी उपायुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, कनिष्ठ अभियंता प्रशांत नेहारे, जन्म-मृत्यु विभागाचे शंभरकर यांचासह इतर अधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नवीन आणि जुन्या इमारतीतील विविध विभागांचे कार्यालय तसेच संपूर्ण परिसरातील स्वच्छ्ता, प्रसाधनगृहांची स्वच्छ्ता, विखुरलेल्या भंगार वस्तू आदींची पाहणी केली. यासोबतच त्यांनी सीएफसी विभाग, परिवहन विभाग, जन्म आणि मृत्यू विभाग, ग्रंथालय विभाग, स्थायी समिती सभागृह, प्रधानमंत्री आवास योजना, पोटोबा केंद्र, अग्निशमन विभाग तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहन पार्किंग स्थळाचे देखील निरीक्षण केले.
मनपा मुख्यालयातील दोन्ही इमारतीतील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले. याशिवाय इमारतींच्या परिसरात विखुरलेल्या भंगार वस्तुंची योग्य विल्हेवाट लावणे तसेच नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या पार्कींगची उत्तम व्यवस्था ठेवण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले. मनपातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांना मिळावा याकरिता सर्व सुविधांनी सुसज्ज सीएफसी कार्यालय मनपा मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर स्थानांतरित करण्याबाबतही डॉ. चौधरी यांनी निर्देश दिले. आकस्मिक पाहणीमध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.