नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (ता.२५) सदर मंगळवारी बजार येथील ठोक व चिल्लर मच्छी मार्केट आणि रहातेकरवाडी येथील रेशिमबाग मच्छी मार्केटची पाहणी केली.
मच्छी मार्केटच्या पाहणी दरम्यान उपायुक्त मिलिंद मेश्राम, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त अशोक घरोटे, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, बाजार अधीक्षक प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, सुनिल उईके, पुरुषोत्तम फाळके, प्र. झोनल अधिकारी सुरेश खरे यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, मच्छी विक्रेते उपस्थित होते.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सदर मंगळवारी बजार येथील ठोक व चिल्लर मच्छी मार्केटच्या पाहणी दरम्यान स्थानिक विक्रेत्यांशी संवाद साधला. आयुक्तांनी मार्केटच्या संदर्भात कार्यकारी अभियंता यांनी विक्रेत्यांची बैठक बोलवून चर्चा करावी, अशी सूचना केली. याशिवाय बाजारपेठेतील चिलिंग रूम, वातानुकूलित व्यवस्था, बसण्याचे ओटे आदीची पाहणी केली. तसेच व्यावसायिकांना बसण्याच्या ओट्यांची उंची कमी करावी, योग्य व्यवस्था करून द्यावी, ओट्यांमधून अस्वच्छ पाणी काढून देण्यासाठी व्यवस्था करावी, बाजारपेठेत हवा खेळती रहावी याकरिता योग्य ती व्यवस्था करावी आदी निर्देश दिले. तसेच रहातेकरवाडी येथील रेशिमबाग मच्छी मार्केटच्या पाहणी दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी तयार मच्छी मार्केटच्या जागेचे आवंटण करण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला दिल्या.