संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दोन वर्षांपासून कामठी नगर परिषद ला प्रशासक राज सुरू असल्याने नगर परिषद ची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.कामठी नगर परिषद च्या मालकी हक्काच्या गाळ्याचे मागील कित्येक वर्षांपासून फेरलिलाव न झाल्याने कामठी नगर परिषद चा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे तरीसुद्धा कामठी नगर परिषद ला दुकान गाळ्यांच्या फेरलीलावासाठी मुहूर्त मिळेना अशी स्थिती आहे.
कामठी नगर परिषद ला आर्थिक उत्पन्नाचे मालमत्ता कर व दुकागाळे भाडे हे दोनच महत्वपूर्ण स्रोत आहेत.त्यात मालमत्ता कराची स्थिती गंभीर आहे.मागणीपेक्षा थकबाकी जास्त असा प्रकार आहे.शिवाय गाळ्यांचे भाडेही व्यापारी कित्येक वर्षांपासून भरत नसल्याचे वास्तव आहे.त्यात बाजार विभागाची स्थितीसुद्धा यापासून वेगळी नाही.
कामठी शहरातील बैलबाजार,शुक्रवारी बाजार, दुर्गा चौक,भाजी मंडी,राम मंदिर, पोरवाल कॉलेज समोर अशा इतर ठिकाणी कामठी नगर परिषद ने आपल्या मालकीच्या जागेवर दुकान गाळे उभारून ते गाळे भाडे तत्वावर व्यापाराकरिता देण्यात आले.या दुकानगाळ्यांच्या माध्यमातुन नगर परिषदला नियमित उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा होती. मागील वर्षीचा आलेख घेतला असता एकूण 695 गाळे धारकाकडून वार्षिक 1 कोटी 33 लक्ष 46 हजार 505 रुपये भाडे वसुली अपेक्षित होती मात्र फक्त 60 टक्के भाडे वसुली झाली आहे. चालू वर्षाची थकबाकी कायम आहे.
वास्तविकता महाराष्ट्र नगर परिषद,नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1968 च्या कलम 92 पोटकलम 3 अनव्ये नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गाळे भाड्याने देता येत नाही.अशात फेर लिलाव करणे गरजेचे असून त्यातही व्यापारी गाळयात आपल्या मर्जीने बांधकाम करु शकत नाहीत.मात्र शहरात कित्येक व्यापारानी आपल्या मर्जीने बांधकाम करून घेतले आहे. तसेच मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषद गाळ्यांचा फेर लिलाव झाला नाही परिणामी त्यावेळी झालेल्या दरानुसारच व्यापारी आजही भाडे देत असल्याने नगर परिषद कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात आहे.ज्याचा शहरातील विकास कामांवर परिणाम होत आहे.