महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

एकाच वेळी 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये जमा

बळीराजा खचू नको.. धैर्याने संकटाला समोरे जा.. शासन आहे पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई :- नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2500 कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतून अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ आज मंत्रालयात झाला. मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, लाभार्थी शेतकरी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

राज्यातील शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून त्याची तातडीने अमंलबजावणीही केली. शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे म्हणून दिवाळी पूर्वी लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने तातडीने कार्यवाही केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही निर्णय घेतले आहेत. एनडीआरएफच्या दुप्पट निधी देणे, नुकसान भरपाईसाठी दोन ऐवजी तीन हेक्टरची मर्यादा करणे, सततच्या पावसात निकषता न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देऊन जास्तीत जास्त जमीन ओलीताखाली आणून शेतकरी बांधवांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत.

सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी ह्यावेळेस पहिल्यांदाच एका क्लिकवर निधी जमा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे कालपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने शेती आणि शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा करण्यात येत आहे. त्यानंतर ऑटोपायलट मोड मध्ये विमा रक्कम मिळावी यासाठी तंत्रज्ञान तयार केले जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

8 लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण – सहकार मंत्री अतुल सावे

योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे 8 लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले कर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Fri Oct 21 , 2022
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.20) ०७ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, नेहरूनगर,गांधीबाग आणि सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ०६ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!