कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

– महाराष्ट्रातील मुंबई-मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृत्यू

– पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली :- कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने मृतदेहांना कुवैतहून भारतात आणले गेले. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आज आगमन झाले. मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3 जणांचा समावेश आहे. या 30 जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले. उर्वरित मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने आणले गेले.

बुधवारी पहाटे साडेचार वाजता ही आग लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे सुरु झाली. भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काहीजण आगीत होरपळून व धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवैतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे. मुंबईच्या मालाड (पश्चिम), मालवणी येथील 33 वर्षीय डेनी बेबी जे मागील चार वर्षांपासून कुवैतमधील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते, ते मृत्युमुखी पडले.

मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3, उत्तर प्रदेशातील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा यासारख्या उर्वरित सात राज्यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण 45 जणांचा समावेश आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेती अधिकारी सतत संपर्कात असून, या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हून अधिक भारतीयांवर उपचार सुरु आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृतदेह दिल्ली येथून रात्री 11.40 वाजता 6ई 519 या विमानाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येईल. सदर विमान शनिवारी पहाटे 1.40 वाजता मुंबई येथे पोहचेल. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी कुवैत येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक समन्वय साधत या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्रातील डेनी बेबी करूणाकरण यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप पोहचविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राजशिष्टाचार अधिकारी किशोर कनौजिया यांनी याबाबत आवश्यक समन्वय केले.

पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी एक्सच्या माध्यमातून हा दुर्दैवी प्रसंग अत्यंत वेदनादायक असल्याचा शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुती सरकारच्या दादागिरी मुळे बहुजन विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती आणि PhD Fellowship पासून वंचित ठेवण्याचा डाव

Sat Jun 15 , 2024
– महाराष्ट्र राज्य शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त भटके, विशेष मागास प्रवर्ग, मराठा कुणबी, अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये ‘समान धोरणा’च्या नावाखाली जाचक अटी घातल्या आहेत. यामुळे बहुजन विद्यार्थ्याचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होवू शकणार नाही. नागपूर :- परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावी, बारावी आणि पदवीला ७५ टक्के गुणांच्या शैक्षणिक अर्हतेची अट घालत, शिष्यवृत्तीमधील शिक्षण शुल्काला ३० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com