नागपूर :- 29 नोव्हेंबर रोजी रवीनगर येथे प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘शिवबा ते छत्रपती’ ‘जीवनगाथा शिवरायांची ‘या संकल्पनेवर आधारित या वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह, जोश आणि शिस्तबद्धतेने साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाने शाळेच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यांची आणि त्यागाची प्रभावी आठवण उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पांजली अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच प्रमुख पाहुणे एअर व्हॉइस मार्शल सूर्यकांत तसेच धरमपेठ हायस्कूल इतिहास विभागाचे डॉ.सतीश चाफले. तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड.अशोक बन्सोड, संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद फडणवीस, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, संस्थेचे सचिव विजय कागभट, सी.पी.अँड बेरार एमबीए डिपार्टमेंटचे भावे , प्रहार मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या वंदना कुलकर्णी, संस्थेतर्गत येणाऱ्या शाळांचे प्राचार्य रसिका काळे, कृष्णा रंधाई, विजया दहिकर, लीना नागरिकर व पूजा गांगुली यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या स्वागत भाषणात महाराजांच्या अद्वितीय नेतृत्व गुणांवर आणि त्यांच्या जीवनातील मूल्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की शिवाजी महाराजांचा आदर्श फक्त इतिहासापुरता मर्यादित नसून, आजच्या काळातही तो तितकाच महत्त्वाचा आहे.
विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या कर्नल सुनील देशपांडे यांचे अनुभव असा एक प्रसंग, ‘शिवरायांचा जन्म’ ‘शिवरायांचे बालपण’ ‘रायरेश्वर मंदिरातील प्रतिज्ञा’ ‘तोरणा किल्ला’ शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे, बाजीप्रभू ‘शाहिस्तेखानाची फजिती’ ‘प्रतापगडचा पराक्रम’ ‘अफजलखान वध’ ‘शिवाजी महाराजांची युद्धनीती’ आणि ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा’ यांसारख्या नाट्यमय प्रसंगांनी तसेच बहारदार नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कलाकारांच्या वेशभूषा, अभिनय आणि संवादफेकीमुळे इतिहास जणू प्रत्यक्ष उभा राहिला होता. नृत्यगायन सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आणली. विशेषतः, पारंपरिक मराठी पोवाड्यांनी उपस्थितांना भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या समारोपाला शाळेच्या संचालक मंडळांनी तसेच मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा आदर्श अंगीकारण्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुण्यांनीही या कलाप्रदर्शना बद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालकांनी आणि उपस्थितांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे अभिनंदन करत, विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या आवारात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘जीवनगाथा शिवरायांची’ हा स्नेहसंमेलनाचा विषय विद्यार्थ्यांच्या स्मरणात कायमचं कोरलं गेलं. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका शोमा पाल यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमाचे स्क्रिप्ट रायटिंग शाळेच्या शिक्षिका वैशाली भुसारी यांनी लिहिले.