कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा ४८ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांसह संपन्न

विद्युत वसाहतीत फ्री वाय-फाय आणि अत्याधुनिक सुविधा देण्यावर भर द्यावा…पंकज सपाटे

वीज उत्पादनासोबत सायबर सुरक्षेबाबत जागरूकता महत्वाची…नितीन चांदूरकर

कोराडी :- कोराडी वीज केंद्र हे भौगोलिक दृष्ट्या आणि नफा-तोट्याच्या दृष्टिकोनातून महानिर्मितीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वीज उत्पादन विषयक सर्वांगाने कार्यक्षमता वाढीसाठी कार्यरत मनुष्यबळ आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वसाहत परिसरात फ्री वायफाय सुविधा, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा तसेच इतर स्थानिक सोयी सुविधांसाठी मुख्य अभियंता स्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात यावे असे मत पंकज सपाटे यांनी व्यक्त केले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४८ व्या वर्धापन दिनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते रंगमंच कोराडी येथे बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे होते. विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक(माहिती व तंत्रज्ञान) नितीन चांदूरकर, कार्यकारी संचालक-१ गिरीश कुमरवार, मुख्य अभियंते शरद भगत, माजी मुख्य अभियंते राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर,वर्धापन दिन समिती सचिव शैलेंद्र अर्जितवार, सहसचिव निलेश चरखे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी शैलेंद्र अर्जितवार यांनी अहवाल वाचन व प्रास्ताविक केले. यानंतर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अनबलगन, संचालक(संचलन-प्रकल्प) संजय मारुडकर, संचालक(खनिकर्म) दिवाकर गोखले यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी नितीन चांदूरकर म्हणाले की, डिजिटल क्रांतीमुळे काम अगदी सोपे झाले आहे हे खरे. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्याने ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे हा अतिशय चिंतेचा विषय झाला आहे. मोबाईलवरून एप डाऊनलोड करतांना सहज एक्सेस देण्यात येत असल्याने डाटा सुरक्षित राहत नाही. ऑनलाईन कामकाजावर अवलंबून राहणे, सायबर विषयक नागरिकांमध्ये जागरूकतेचा अभाव, पोलीस दलाची तोकडी तांत्रिक क्षमता, तपासातील अडचणी, मोजकी सायबर स्थानके, मोबाईल एपची छुपी ग्राहक नीती, सायबर कायद्यातील तरतुदी, प्रभावी रेग्युलेटर नसणे, संघटीत सायबर माफिया यामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढतच आहे. वीज उत्पादन क्षेत्र अतिशय संवेदनशील असल्याने डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर जागरूकता तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

गिरीश कुमरवार म्हणाले की मुख्यालयाच्या दृष्टीने हे केंद्र महत्वाचे असल्याने अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. याप्रसंगी राजकुमार तासकर, अनिल आष्टीकर, शरद भगत यांनी समयोचित भाषणे केली. अध्यक्षस्थानाहून अभय हरणे म्हणाले की, कोराडीची एकूणच कार्यक्षमता अधिक वाढवावी लागेल त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन दीप्ती राम, आकाश थूटे यांनी तर प्रभारी कल्याण अधिकारी दिवाकर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळी पूजेला माजी मुख्य अभियंता शरदचंद्र देव हे आवर्जून उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, ब्रिज, बुद्धिबळ, कॅरम, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, रांगोळी, चित्रकला, हाऊस कीपिंग स्पर्धा, रक्तदान शिबिर घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सांघिक खेळांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. शिवाय इव्हेंट प्रस्तुत हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सारंग जोशी, सागर मधूमटके आणि चमूने सादर केला.

या प्रसंगी उप मुख्य अभियंते विराज चौधरी, प्रफुल्ल कुटेमाटे, डॉ.अनिल काठोये, श्याम राठोड, अरुण पेठकर, अधीक्षक अभियंते,अंकुर जोशी,अशोक भगत, सचिन देगवेकर, कमलेश मुनेश्वर, संतोष चंद्रमणी, राजेश अलोणे, नितीन रोकडे, मनोज देशमुख प्रभारी, डॉ.भूषण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकेश गजभिये, उप महाव्यवस्थापक(मासं) दिवाकर देशमुख, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा विनायक वडोदकर तसेच कोराडी वीज केंद्राचे विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी-तंत्रज्ञ-कंत्राटी कामगार, कुटुंबीय, संघटना प्रतिनिधी उपस्थित होते तर वर्धापन दिन आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी-सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धावत्या रेल्वेत गोंडस बाळाला जन्म

Sun Nov 6 , 2022
-तेलंगणा एक्सप्रेसमधील घटना -लोहमार्ग पोलिसांची तप्परता नागपूर :- प्रसूतीची वेळ जवळ आल्याने ती तडफडत होती. असह्य वेदना होत होत्या. काही वेळातच तिची प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ही घटना धावत्या रेल्वेत सेवाग्राम-नागपूर दरम्यान दुपारच्या सुमारास घडली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच लोहमार्ग पोलिसांनी तिला मदतीचा हात दिला. डॉक्टरांनी तपासणी केली. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 प्रीती प्रदीपकुमार (22), […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com