अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचे 22 जानेवारीचे निमंत्रण आपल्याला मिळत नाही, असे पाहून की काय, शिल्लक शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले की- “त्यादिवशी मी राममंदिरात जाणारच. फक्त ते अयोध्येचे नसेल, तर नाशिकचे असेल. म्हणजे, नाशिकच्या पंचवटी भागात असलेल्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात मी जाणार, आरती करणार, गोदावरी नदीचीही आरती करणार.”
त्यांच्या या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. अयोध्येच्या निमंत्रणाचा वाद करत बसण्यापेक्षा वेगळे राम मंदिर शोधून त्यांनी चांगला मार्ग काढला आणि विनाकारण होऊ शकलेला संघर्ष टाळला. हे पाहून असे वाटते की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही असाच संयमित मध्यममार्ग त्यांना काढता आला असता तर, भाजपा-शिवसेना ही दीर्घ हिंदुत्ववादी युती टिकून राहिली असती आणि महाराष्ट्रात गेली सव्वाचार वर्षे सुरू असलेले रामायण-महाभारत घडले नसते. परिणामी अयोध्या निमंत्रणाचा तिढाही निर्माण झाला नसता आणि त्यांना 22 ला रामललाच्या थेट दर्शनाला जाता आले असते. परंतु तसे होणे नव्हते. राजकारण आड आले आणि टप्प्याटप्प्यावर अजूनही आड येतच आहे. कदाचित रामाच्याच मनात नसावे ?
अयोध्येचे आधुनिक रामलला मंदिर नवे असले तरी, पंचवटीचे काळा राम मंदिर आजच्या स्वरूपात सव्वादोनशेच्या वर वर्षे उभे आहे. मुळात ते दोन हजार वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. तसेच, इसवी सन 7 ते 11 या राष्ट्रकुटांच्या राजवटीत केव्हातरी ते उभारले गेले असल्याचीही शक्यता आहे. मात्र, तुर्की आक्रमकांपासून वाचविण्यासाठी पुजाऱ्यांनी मूर्तीच गोदावरी नदीत फेकून दिली आणि हे मंदिर विस्मृतीत गेले. पुढे मराठेशाहीतील सरदार रंगराव ओढेकर यांच्या स्वप्नात हा काळा राम आला. तेव्हा त्यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस ही मूर्ती गोदावरीतून बाहेर काढवून काळा राम मंदिराचे पुनर्निर्माण केले. त्यामुळे मंदिर परिसरात सरदार ओढेकर यांचाही पुतळा उभारण्यात आला आहे.
या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. 14 वर्षांच्या वनवासाचे प्रतीक म्हणून मंदिराच्या गाभाऱ्याला 14 पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच, मंदिरात एकूण 84 खांब आहेत. त्यांना 84 लाख योनी (जन्माच्या) कल्पनेचे प्रतीक मानले जाते. मूर्त्यांसह संपूर्ण मंदिर काळ्या दगडाचे असल्यामुळे याला काळा राम मंदिर म्हटले जाते. वनवासाची 10 वर्षे संपल्यावर राम, लक्ष्मण, सीता हे तिघे पंचवटीत अडीच वर्षे राहिले, अशी मान्यता आहे.
अयोध्येप्रमाणेच येथेही संघर्ष ( पण वेगळ्या प्रकारचा) झाला आणि हे मंदिरही गाजले. तत्कालीन अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी येथे मोठा सत्याग्रह झाला. शेकडो आंदोलकांनी मंदिराला घेराव घातला. नंतर 9 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी निघालेली राम रथयात्रा अडविण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली आणि त्यात बाबासाहेबांसह अनेक जण किरकोळ जखमी झाले. या धुमश्चक्रीत भास्कर केन्द्रे नामक कार्यकर्ते पोलिस बंदोबस्ताला चकवून मंदिरात प्रवेशते झाले. पण ते लगेच कोसळले. पुढे 1935 पर्यंत असे आंदोलन अधूनमधून होत राहिले. नंतर 13 ऑक्टोबर 1936 रोजी नाशिक जिल्ह्यातीलच येवला येथे बाबासाहेबांनी हिंदुधर्मत्यागाची ऐतिहासिक घोषणा केली.
संघर्षाची अशी पृष्ठभूमी असल्यामुळेच, अयोध्येशी समांतर वाटावे म्हणून काळा राम मंदिर निवडले गेले असू शकते. त्यापेक्षाही, यात स्वत:ची सोयही पाहिली गेली, असे स्पष्टपणे जाणवते. कारण, 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती यंदा नाशिक येथे साजरी करण्याची उबाठा शिवसेनेची योजना आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे फुटीनंतरचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकला आणि सायंकाळी कन्हेरे मैदानावर जाहीर सभा (12 जानेवारीला मोदींची सभा नाशकात होणार, म्हणून) घेण्याचे ठरले आहे. एकूण परिस्थिती पाहता अयोध्येऐवजी नाशिकचेच राम मंदिर जवळ करणे सोयीचे, असे गणित मांडले गेले असू शकते. अयोध्येत काय, प्राणप्रतिष्ठेनंतरही जाता येईल. 22 जानेवारीला काळा राम मंदिरात जाऊन रामभक्ती सिद्ध करायची आणि निमंत्रण असो-नसो, राम आमच्या मनातच आहे, असे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे, हे उघड आहे. तरीही, परिस्थितिवश का होईना, उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी संभाव्य संघर्ष टाळला, हेही नसे थोडके.
– विनोद देशमुख