– डासांमुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना संदर्भात चर्चा
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण व मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे डासांमुळे होणारे आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना या संदर्भात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. 06 ) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, सीपीएम अश्विनी निकम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सूलभा शेंडे, डॉ वर्षा देवस्थळे, डॉ मालखंडाले, डॉ. शीतल वंदिले लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, आशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे डासांमुळे होणारे आजारांवर नियंत्रणासाठी उपाययोजना विषयी चर्चा केली. तसेच एकूण किती भागात फॉगिंग आणि स्प्रेईंग झाले आहे याचा आढावा त्यांनी घेतला. झोननुसार मशीन किती आहे तसेच डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता फॉगिंग आणि स्प्रेईंग करणाऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करून प्रत्येक झोननुसार फॉगिंग आणि स्प्रेईंग नियमितपणे करण्याचे निर्देष झोनल अधिकारयांना दिले.
त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णालयात नियमित होणाऱ्या लसीकरणाचा आढावा देखील घेतला. उच्च जोखीम क्षेत्रात शासनाची मोहीम राबविण्यात येणार असून वंचित असलेल्या बालकांची एक यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरण वाढविण्यासाठी संबंधित अधिकारी, झोनल अधिकाऱ्यांनी युपीएचसी स्तरावर अंगणवाडी कर्मचारी, आशा एएनएम आदी कर्मचाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा व एएनएम यांच्या नोंदवहीची नियमित तपासणी करावी, असे निर्देश गोयल यांनी बैठकीत दिले. याशिवाय बालकांच्या लसीकरणासाठी महिला आरोग्य समितीच्या सदस्यांचा सहभाग वाढवा याकरिता नियमित बैठक घेण्यात यावी, असेही निर्देशही गोयल यांनी दिले.
बैठकीत सर्वप्रथम प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी गत महिन्यात लसीकरणापासून वंचित व उशिरा झालेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. तर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नियमित लसीकरणाचा आढावा सादर केला.