नागपूर :- नागपूर शहरातील कुठल्याही रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. पावसामुळे शहरात विपरीत स्थिती निर्माण होउ नये यासाठी प्रत्येक विभागाने सजग राहण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी नेहमी पावसाचे पाणी जमा होते त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करून पाणी राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले. ज्या इमारतीच्या बेसमेंटमधे पाणी जमा होते त्या इमारतींना नोटीस देणे तसेच झाड पडणे, फांद्या खचणे अशा स्वरूपाच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करणे आणि जी झाडे वाळलेली आहेत व पडण्याच्या स्थितीत आहेत ती शोधून त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात गुरूवारी (ता.२०) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभाग आणि झोननिहाय आपत्ती व्यवस्थापन तयारीचा आढावा घेतला.
आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख महेश धामेचा, मुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, हरीश राउत, घनश्याम पंधरे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता सर्वश्री अजय मानकर, रवींद्र बुंधाडे, गिरीश वासनिक, विजय गुरूबक्षाणी, अनिल गेडाम, मनोज सिंग, उज्ज्वल धनविजय, उज्ज्वल लांजेवार, सचिन रक्षमवार, संजय माटे आदी उपस्थित होते.