नागपूर :- नागपूर शहरात पावसाळयाचे आगमन झाले आहेत. पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणानी दूषित झाल्यास कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, हगवन अशा आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. तसेच उघडयावरील खाद्यपदार्थावर माशा बसून ते दूषित झाल्यास उलटया, जुलाब, कावीळ अशा प्रकारचे आजार होतात. सर्वसाधारण पणे पावसाळयामध्ये अशा आजाराचे प्रमाण वाढते. म्हणून नागरिकांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारापासून काळजी घेण्यासाठी नागरिकांनी मनपा नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोरवेल शुध्दीकरण न केलेल्या विहीरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये, शिळे किंवा उघडयावरचे माशा बसलेले अन्न पदार्थ खाऊ नये तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. हातगाड्यांवर उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ खाऊ नये, पावसाळयात पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पिण्याच्या पाणी दुषित आढळल्यास त्यामध्ये क्लोरीन गोळ्यांचा वापर करावा व एक क्लोरीनची गोळी २० लीटर पाण्यामध्ये चुराकरुन टाकावी. पावसाळ्यात खाद्यपदार्थ उघडे न ठेवता झाकून ठेवावे, भांडी स्वच्छ ठेवावी, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा. भेलपुरी, पाणीपुरी वाल्यानी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, क्लोरीनच्या गोळीचा वापर करावावा व हॅन्डग्लॉल्जचा वापर करावा. प्रत्येक नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, टायफाइड झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करावेत. सर्व मनपा व शासकिय दवाखान्यामध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात गॅस्ट्रो रुग्णांवर मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे.
ताप, मळमळ, चक्कर, उल्टी, हगवन, इत्यादी गॅस्ट्रोची लक्षणे असून रुग्णाला त्वरित ओ. आर. एस. पाजावे व त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावा. सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे उपचारास आलेल्या अशा रुग्णांची माहिती मनपा आरोग्य विभागास त्वरित दयावी. याशिवाय नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच नागरिकांना मनपाला सहकार्य करावे. असे आवाहनही डॉ. नरेंद्र बहिरवार केले आहे.