– पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार थेट लाभार्थ्यांशी संवाद
नागपूर :- विकसीत भारत संकल्प यात्रा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा दहाही झोन निहाय विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्यासंख्येत शिबिरांना भेट देत विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
शनिवारी ९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता विकसीत भारत संकल्प यात्रा प्रारंभ होणार असून देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध भागातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, अमरावती रोड, नागपूर येथे लाईव्ह असणार असून, याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व आमदार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने यांच्यासह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेतर्फे विकसीत भारत संकल्प यात्रेची माहिती देणा-या रथांद्वारे शहरामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. झोनस्तरावर विविध भागांमध्ये शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत असून, या शिबिरांना हजारोंच्या संख्येत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिबिराच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, ई-बस, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून दिला जात आहे. यासोबतच शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांना झालेला फायदा, मिळालेला लाभ ते स्वत: ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ च्या माध्यमातून आपल्या अनुभवातून व्यक्त करीत आहेत.
“नमो महारोजगार मेळावा”साठी आपली बसची सेवा
कार्यक्रमस्थळी शनिवार ९ आणि रविवार १० डिसेंबर २०२३ रोजी “राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा” घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मनपाच्या परिवहन विभागाकडून “आपली बस” ची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे ने-आण करण्याकरिता मोरभवन, इतवारी रेल्वे स्टेशन, मुख्य रेल्वे स्टेशन, अजनी रेल्वे स्टेशन, गणेशपेठ बस स्थानक, मध्य नागपूरातील गांधीबाग उद्यान, पूर्व नागपूरातील छापरू नगर, उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर लाल गोदाम चौक, दक्षिण-पश्चिम नागपुरातील रेडिसन-ब्लु हॉटेल जयप्रकाश नगर चौक दक्षिण नागपुरातील मेडिकल चौक व पश्चिम नागपुरातील बालसदन जुना काटोल नाका चौक येथून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रोजगार मेळाव्याकरिता येणा-या उमेदवारांनी “आपली बस” सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.