– अखिल भारतीय किन्नर संमेलनाला सदिच्छा भेट
नागपूर :- जात-पात-धर्म-लिंग कोणतेही असले तरीही प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला पाहिजे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात म्हटले आहे. किन्नर समाजानेही संविधानातील अधिकारांचा लाभ घेत स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग निवडावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.
रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात आयोजित अखिल भारतीय किन्नर संमेलनाला ना. गडकरी यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ना.गडकरी म्हणाले, ‘किन्नर समाजातील अनेकांनी चांगले शिक्षण घेऊन समाजात प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास झाला पाहिजे, ही आपली विकासाची संकल्पना आहे. या तिन्ही पातळींवर विकास होणे, हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या प्रतिभेच्या जोरावर समाजात मानाचे स्थान प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करावा.’ यावेळी आर्थिक आणि सामाजिक विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘आर्थिक विकास होण्यासाठी आपल्यातील कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.
कौशल्य विकासासाठी भारत सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेऊन आपल्यातील कौशल्य व्यक्तित्वात आणले तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येईल. सामाजिक विकास देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. समाजात चांगला व्यवहार आणि प्रत्येकाशी चांगली वागणुक तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देईल आणि सामाजिक विकासाचा मार्गही मोकळा होईल.’ यावेळी किन्नर समाजाने संघटित होऊन विकासाचा दृष्टिकोन घेऊन योजना आखावी, असे आवाहनही ना. गडकरी यांनी केले.