– श्रुती-जश जोडीला मिश्र दुहेरीचे, सानिल-सिद्धेशला पुरुष दुहेरीचे कांस्यपदक*
पणजी :-महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोष आणि श्रुती अमृते जोडीने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिला दुहेरी टेबल टेनिसच्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रुतीने जश मोदीच्या साथीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकून दुहेरी यश मिळवले. याचप्रमाणे सानिल शेट्टी आणि सिद्धेश पांडे जोडीला पुरुष दुहेरीत कांस्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने एक सुवर्ण आणि दोन कांस्य अशी एकूण तीन पदके पटकावली.
महिला दुहेरीत महाराष्ट्राच्या स्वस्तिका-श्रुती जोडीने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या सागरिका मुखर्जी आणि कौशानी नाथ जोडीचे कडवे आव्हान ३-० (११-७, ११-२,१२-१०) असे मोडीत काढले.
मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत पराभवामुळे श्रुती आणि जश जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालच्या कौशानी आणि अंकुर भट्टाचार्य जोडीने श्रुती-जश जोडीचा ३-१ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सनील शेट्टी आणि दिया चितळे जोडीने पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोष आणि मौमा दास जोडीला ३-१ असे हरवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले.
पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात सानिल आणि सिद्धेशने पराभव पत्करला. पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य आणि अनिर्बन् घोष जोडीने त्यांना ३-१ (११-७, ११-१३, ११-७, १३-११) असे चुरशीच्या सामन्यात नमवले.
महिला एकेरीत दिया आणि स्वस्तिका यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघींमध्ये गुरुवारी सामना होईल. दियाने उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूच्या ग्लॅडलिन सागायावर ४-० (११-९, १२-१०, ११-५, ११-५) असा शानदार विजय मिळवला. तर स्वस्तिकाने काव्या श्री बसाकला ४-० (११-५, १७-१५, ११-८, ११-६) असे पराभूत केले.