▪️ नागपूर येथे शौर्य दिन साजरा
नागपूर :- कोणत्याही परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सेना ही दक्ष आहे. सर्जीकल स्ट्राईक हा भारताच्या शौर्याला अधोरेखित करणारे एक प्रतिक आहे. देशाच्या शांततेला, कुठल्याही भूमीला, कोणता देश जर वाईट हेतूने पाहत असेल तर अशा शत्रू राष्ट्राच्या सिमेत जाऊन त्यांना आम्ही धडा शिकविणाऱ्यांपैकी आहोत, असे उद् गार ब्रिगेडिअर सुनील गावपांडे ( नि.) यांनी काढले.
बचत भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शौर्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कर्नल जयेश पवार, ग्रृप कॅप्टन रवी किरण (नि), सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सत्येंद्र कुमार चौरे, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व माजी सैनिक यावेळी उपस्थित होते.
भारत हा सौहार्दतेला जपणारा देश आहे. आपण या सौहार्दतेला आजवर कधी बाधा पोहचू दिली नाही. शेजारील देशांनी मात्र हे सौहार्दतेचे तत्त्व जपले नाही. वेळोवेळी घूसखोरी करणे, आतंकवादी कारवाया करणे असे भ्याड कृत्य शेजारी पाकिस्तानने केले आहे. याला वेळोवेळी भारतीय सेनेतर्फे चोख प्रत्युत्तर दिले असल्याचे ब्रिगेडिअर गावपांडे यांनी सांगितले. देशाच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली त्यांच्या विसर पडता कामा नये असे ते म्हणाले. 1995 ते 97 अशी दोन वर्ष त्यांनी उरी-बारामुला येथे मेजर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सत्येंद्र चौरे यांनी केले. यावेळी ग्रृप कॅप्टन रवी किरण (नि) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली धरमठोक यांनी तर आभार संजय केवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.