‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते टॅबचे वितरण  

नागपूर, ता. ५ : मनपाच्या ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासोबतच ऑनलाईन शिक्षण सुद्धा घेता यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शनिवारी (ता. ५) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, सदस्य नागेश सहारे, सदस्या संगीत गिर्हे, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर, उपशिक्षणाधिकारी सुभाष उपासे, नागपूर खासगी शिकवणी वर्ग संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत बोंद्रे, सचिव गणवीर सर आदी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनपाच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही कमी राहणार नाही अशा प्रकारे विद्यार्थ्यांना घडविण्यात येत आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाशी जोडून त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. ‘सुपर-७५’ विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन शिक्षण घेता यावे, शिकवणी वर्गाव्यतिरिक्त घरी सुद्धा विविध शैक्षणिक अप्लिकेशनच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी त्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला. या टॅबचा उपयोग आपले भविष्य घडविण्यासाठी करा, असे आवाहन यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच पालकांनी सुद्धा घरी मुलांकडे लक्ष द्यावे, त्यांचा अभ्यास घेण्यास सांगितले. टॅब सोबतच इंटरनेटची सुविधा सुद्धा मनपाद्वारे विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाचे विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते सुद्धा प्राविण्य श्रेणीत येऊ शकतात हे मागील दोन वर्षात मनपाच्या विद्यार्थ्यांनी करून दाखविले. शहरातील नागरिकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटमध्ये कसे येतील यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच यावर्षी मनपा शाळांतील दहावीचा निकाल शंभर टक्के लागेल, असा विश्वास प्रा. दिलीप दिवे यांनी व्यक्त केला.    यावेळी सभापतींनी महापौरांचे आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकेत शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रिकोटकर यांनी सांगितले की, टॅबचा उपयोग करण्याबाबत विद्यार्थ्यांचा एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येईल. तसेच या टॅब मध्ये शैक्षणिक ॲप शिवाय अन्य कोणतेही ॲप सुरू होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी टॅबचा वापर अभ्यासासाठी, शैक्षणिक कामासाठी करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. टॅबमध्ये लागणारे सर्व ॲप शिक्षण विभागाद्वारे देण्यात येतील. इंटरनेटची सुविधा सुद्धा मनपातर्फे पुरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे त्या म्हणाल्या, ‘सुपर-७५’ ची दुसरी बॅच सुरू करण्यासाठी लवकरच आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन दुसरी बॅच सुरू करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे ;शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्यावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Sat Feb 5 , 2022
– पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक पुणे दि. 5 : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धाना 25 टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.             विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी  विधान परिषदेच्या उपसभापती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com