चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा २३ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येत असुन सर्व संघांसाठी मार्गदर्शपर बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.
उद्या या स्पर्धेची सुरवात होणार असुन स्पर्धेच्या निमित्याने आपल्या शहरासाठी चांगले काम करण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. उद्यान,मोकळ्या जागा या पालिकेची जबाबदारी आहे,त्यांनीच लक्ष दिले पाहीजे या विचारातुन बाहेर पडुन जवळची मोकळी जागा किंवा उद्यान माझे आहे, मी त्यांचे सौंदर्यीकरण केले असल्याने ती सुस्थितीत राहणे माझी जबाबदारी आहे ही भावना या स्पर्धेतुन विकसित होणार असल्याचे आयुक्त यांनी याप्रसंगी सांगितले.
” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा होणार असुन उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था, युवक/युवती मंडळे इत्यादी सर्व मिळुन यात ६० संघ सहभागी झाले आहेत. उद्यान सौंदर्यीकरणासाठी २९ तर ओपन स्पेस विकसित करण्यास ३१ चमुंनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धक गटांना राबवायचे उपक्रम व गुणांकन पद्धत याविषयी माहिती पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे देण्यात आली तसेच साफ सफाईच्या साहित्याचे वाटप आज करण्यात आले. सौंदर्यीकरण करण्यास आवश्यकतेनुसार झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर साहीत्य जसे सुरक्षा साधने इत्यादीचे नियोजन स्पर्धक गट स्वतः करणार आहेत. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन १५ दिवसाची सरासरी उपस्थिती तसेच कामाच्या तासांवर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
बक्षिसे –
प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी ११ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी ७ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी ५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे