वाघाच्या भुमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

– शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण

– ब्रेल लिपीमधील शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि गोंड समुदाय पुस्तकाचे प्रकाशन 

चंद्रपूर :- जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे, मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1, ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

मंचावर नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर, पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले, प्रा. अशोक जिवतोडे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आज मात्र चंद्रपूर या वाघाच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे.

आपल्याला जेव्हा आयुष्य समजायला सुरवात होते, त्या केवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांची विरता, पराक्रम आणि शौय शब्दबध्द करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले, त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची ख-या अर्थाने रयतेचे राज्य चालविले. सुर्याच्या पोटी सुर्यच जन्मतो, त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी तत्वासाठी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे.

संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपला शक्तीशाली वारसा आहे. पुढे मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेथेच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. 4 मे ला वाघ नखं भारतात येत आहे. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यु. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांचे विशेष कौतुक केले. चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा, या जिल्ह्याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्र महान करायचे असेल ‘जय महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्र श्रेष्ठ करायचा असेल चंद्रपूर मोठे करणे आवश्यक आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले. प्रास्ताविकात संचालक विभीषण चवरे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे.

अनेक वर्षाचे काम केवळ दोन वर्षात करून सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात एक वेगळा ठसा उमटविला आहे. पुर्वी वर्षात एखाद कार्यक्रम होत होता. आता विभागाच्या वतीने 400 च्या वर कार्यक्रम करण्यात आले आहे. मंत्री मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविले असून महासंस्कृती महोत्सव, महानाट्य ‘जाणता राजा’ चे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. यावेळी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.

*अंध बांधवांसाठी ब्रेललिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा* : आपल्या राज्यात नोंदणीकृत अंध असलेल्या नागरिकांची संख्या 5 लक्ष आहे. या लोकांपर्यंतसुध्दा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहचविण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ पोहचिवण्याचा निर्णय घेतला. अंध बांधवांपर्यंत शिवाजी महाराज पोहचवू शकलो, याचा आनंद आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याचा सुचना विभागाला दिल्या आहेत.

*महाराष्ट्र : गोंड समुदाय पुस्तकाचे विमोचन* : गोंड समाजाच्या वीरतेचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात 200 एकर जागा उपलब्ध करून दिली. तसेच विद्यापीठासाठी 800 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

*शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचे कॉफीटेबल बुक* : पुराभिलेख विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे उपलब्ध असून ही पत्रे सामान्य जनेतपर्यंत पोहचावित, या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळपत्रांचे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारीत मराठेकालीन टाकसाळी संबंधाची मोडी कागदपत्रे, खंड – 1 हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

*विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध टपाल तिकिटे प्रकाशित* : सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शहाजी महाराज, 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण, 6 जून रोजी राजभवन येथे शिवराज्याभिषेक तिकीटाचे अनावरण करण्यात आले असून केवळ 6 दिवसांत टपाल तिकीट काढण्याचा विक्रम देशात सर्वप्रथम झाला आहे. संत जगनाडे महाराज, बाबा आमटे, शहीद बाबुराव शेडमाके, अण्णाभाऊ साठे या महान व्यक्तिंवरसुध्दा टपाल तिकीट काढण्यात आले आहे. ००

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT   

Sat Mar 9 , 2024
Nagpur :- Sitabuldi Fort will be open to public on 10 March 24 from 09.00hrs to 16.00hrs. The entry to the Fort shall be from Army Recruiting Office gate opposite the Railway Station on producing identity proof.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com