काँग्रेसच्या खोटारडेपणाला जनता उत्तर देईल – सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

– माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त साधला संवाद

ब्रह्मपुरी :- काँग्रेसने फेक नरेटिव्ह सेट करून मते मागितली. खोटा प्रचार केला. भाजपचा कार्यकर्ता तर हा खोटेपणा हाणून पाडेलच, शिवाय जनताच काँग्रेसला योग्यवेळी उत्तर देईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काल (शनिवार) व्यक्त केला.

ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता महामेळाव्यात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक नेते, उत्सवमूर्ती अतुल देशकर, माजी आमदार सुधीर पारवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, प्रा. गोपीचंद गणवीर, काशीनाथ थेरकर, प्रा. कादर शेख, प्रकाश वाघमारे, अरुण शेंडे, बाळुभाऊ नंदूरकर, राजू बोरकर, अविनाश पाल, कृष्णा सहारे, संतोष तंगडपल्लीवार, नागराज गेडाम, संजय गजपुरे, तनय देशकर, निलम सुरमवार, साकेत भानारकर, रामलाल दोनाडकर, प्रा. सुयोग बाळबुधे, मनोज भुपाल, मनोज वठे, रश्मी पेशने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘लोकांची दिशाभूल करीत काँग्रेसने लोकसभेत जागा जिंकल्या. स्पर्धेत कासव एकदा जिंकू शकतो. पण शंभर स्पर्धांमध्ये शक्य नाही. काँग्रेसला अहंकाराची बाधा झाली आहे. एवढा अहंकार काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आला आहे की तेच अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात ‘मीच पुढचा मुख्यमंत्री आहे’. आम्ही हिशेब लावला तर आतापर्यंत 11 ‘इ-मुख्यमंत्री’ अर्थात इच्छुक मुख्यमंत्री महाविकास आघाडीत झाले आहेत. काहीतर इ-मंत्री झाले आहेत. घाईघाईत व्हिजिटींग कार्ड, लेटरहेड छापले नाहीत, म्हणजे नशीब.’

आपण 100 वर्षे जगावे!

माजी आमदार अतुल देशकर यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभावे, या शब्दांत ना. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या. ‘मी विद्यार्थी दशेत होतो, त्यावेळी देशकर हे सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक होते. ते शिकवत होते त्या वर्गात नसलो तरीही त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी मला मिळाली,’ असेही ते म्हणाले.

निधी कमी पडणार नाही

महाविकास आघाडी लोकांमध्ये खोटा प्रचार करीत आहे. लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी भीती दाखविली जात आहे. जगातील कोणतीही ताकद लाडकी बहीण योजना बंद करूच शकत नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी कधीच निधी कमी पडणार नाही, असे ना. मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले. माजी आमदार अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरीतील काही कामांच्या संदर्भात निवेदन दिले आहे. त्याचा मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे, असेही ते म्हणाले. वन विभागाने राबविलेल्या योजनेमुळे अनेक गृहिणींना घरगुती वापराचे सिलिंडर मिळाले. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर आता वन क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनाही मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार असल्याचे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने नाकारले

पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी महाविकास आघाडीने मान्य केली नाही. शेतकऱ्यांना नाकारण्याचे काम केले. यासंदर्भात मी तत्कालीन सरकारला अधिवेशनात धारेवर धरले होते. तरीही त्यांची मुजोरी कायम होती. महायुतीची सत्ता येताच धानाला प्रति हेक्टर 20 हजार रुपयांचा बोनस जाहीर झाला, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाबा ताजुद्दीन का १०२वां सालाना उर्स २९ जुलाई से मनाया जायेगा

Sun Jul 28 , 2024
–  ताजाबाद में परचम कुशाई से होगा शुभारम्भ –  देश विदेश से पहुंचेंगे श्रद्धालु –  १५ लाख लोगों के लिए रहेगी लंगर व्यवस्था    नागपुर :- हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह का १०२वान सालाना उर्स २९ जुलाई से १० अगस्त तक धूमधाम से मनाया जायेगा. सालाना उर्स के अवसर पर हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की ओर से विविध धार्मिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!