– विद्यापीठात अपस्कीलींग द एन.ई.पी. एक्झिक्युटर्सवर एक दिवसीय परस्परसंवादी कार्यशाळा संपन्न
अमरावती :- नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सर्व विद्यापीठांमध्ये करावयाची असून वस्तुनिष्ठ अंमलबजावणीवर महत्त्वपूर्ण यश अवलंबून असल्याचे प्रतिपादन एन.ई.पी. 2020 महाराष्ट्र शासनाच्या सुकाणू समितीचे सदस्य प्रो. अनिल राव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात यु.जी.सी. मानव संसाधन विकास केंद्राच्यावतीने अपस्कीलींग द एन.ई.पी. एक्झिक्युटर्सवर विषयावर आयोजित परस्परसंवादी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू डॉ. महेश्वरी, एचआरडी मानव संसाधन केंद्राचे संचालक डॉ. मोहम्मद अतिक उपस्थित होते.
एन.ई.पी. ची अंमलबजावणीवर मार्गदर्शन करताना प्रो. राव म्हणाले, शासन निर्णयानुसार एन. ए. पी. ची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यावर्षी स्वायत्त महाविद्यालय तर पुढील वर्षी सर्व अभ्यासक्रमांना एन.ई.पी. लागू करावयाचा आहे. यावर्षी उजळणी व पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने विद्यापीठात आयोजित कार्यशाळा महत्त्वाची असून लागू करताना अभ्यास मंडळांना जे जे प्रश्न येतील ते सुकाणू समिती सोडवणार आहे.
पुढे म्हणाले शिक्षणात परिणामकारकता तपासत असताना ज्ञान, समज, कौशल्य, मूल्ये व वृत्ती या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये त्या विकसित व्हायला हव्यात. नवीन शैक्षणिक धोरणात याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्याला जे जे अभ्यासक्रम हवे आहेत, ते देण्याची आपली तयारी असायला हवी. विद्यार्थी केंद्रित शिक्षण हा बदल झाला पाहिजे. अभ्यास मंडळांनी एन.ई.पी. नुसार अभ्यासक्रम कसे तयार करावे, त्यामध्ये कुठल्या बाबींचा विचार करायचा, समावेशकता, अध्यापन, मूल्यांकन आदी विषयी सविस्तर माहिती देऊन परिणामाचे प्रात्यक्षिक यश यातून कसे मिळतील यावर भर द्यावा, असे प्रोफेसर राव म्हणाले.
प्रमुख अतिथी प्रो. माहेश्वरी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने एन.ई.पी.चे महत्त्व अधिक आहे. नवीन अभ्यासक्रम लागू करताना समाविष्ट करावयाची कार्यपद्धती, पदवी, क्रेडिट आदींवर त्यांनी सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर म्हणाले, एन.ई.पी. नुसार अभ्यासक्रम लागू करताना कार्यशाळेत होणारे विचार मंथन महत्त्वाचे आहे. कार्यशाळेत नव्याने अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपस्थितांना मिळतील. प्रात्यक्षिक समस्यांवर चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परीक्षा व मूल्यांकन पद्धतीत नवीन धोरणामुळे बदल होत आहे. त्याबाबतचे मार्गदर्शक तत्व व नियमाचे तंतोतंत पालन आम्हाला करावयाचे आहे. पेपर सेटर्स, मॉडरेटर्स पर्यंत गाईडलाईन पोहोचवायच्या असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक चर्चा करण्यात आली व उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यात आली. दुपारच्या सत्रात हव्याप्र मंडळाचे अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. मराठी व विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.व्ही. डुडुल यांनी मार्गदर्शन केले.
सुरुवातीला संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हार्रापण तसेच राष्ट्रगीत, विद्यापीठ व महाराष्ट्र गीत गायनात आले. प्रस्ताविकेतून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका संचालक डॉ. मो.अतिक यांनी मांडली. याप्रसंगी पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्राचे संचालन व आभारप्रदर्शन युजीसी-एस.आर.डी.सीच्या सहा. प्रा. डॉ. व्ही. एस. कुमार यांनी केले. कार्यशाळेला सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सर्व अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्यापीठातील शिक्षक व संख्येने उपस्थित होते.