भंडारा :- पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत कुक्कुटपालन, शेळी मेंढी युनिट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण निर्मिती या प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येते.या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व प्रकल्प संचालक विवेक बोंद्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली.
तसेच योजना गावपातळीपर्यत पोहचवून जास्तीत जास्त पशुपालकांना लाभ होईल असे नियोजन करून उद्योजक तयार करावेत.असे प्रतिपादन जिभकाटे यांनी केले. रोजगार निर्मिती व उद्योजकता विकासासाठी पशुधनाची उत्पादकता दूध, लोकर, अंडी, मांस, वैरणाची उपलब्धता वाढविणे, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे हा राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश आहे. असंघटित क्षेत्रातील उत्पादनांची विक्री व्हावी व त्यांना चांगला कच्चा माल मिळावा, यासाठी संघटित क्षेत्राशी जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या अभियानात कुक्कुट शेळी, मेंढी व वराह प्रजाती विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास या अंतर्गत अर्ज करता येतील. त्यात अंडी उत्पादनासाठी एक हजारपेक्षा अधिक कुक्कुट संगोपन प्रकल्पाकरिता 25 लाख अनुदान उपलब्ध आहे. शेळी-मेंढी युनिटसाठी 100 मादी व 5 नर ते 500 मादी व 25 नर यानुसार 10 ते 50 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. वराह पालन युनिटसाठी 50 मादी व 5 नर ते 100 मादी व 10 नर याप्रमाणे 15 ते 30 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे. पशुखाद्य व वैरण, मूरघास बेलर , वैरणीच्या विटा, टीएमआर निर्मिती प्रकल्पाला 50 लाख रुपये अनुदान उपलब्ध आहे.
या योजना केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना असून, योजनेकरिता वैयक्तिक स्वयंसहायता बचतगट, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी तसेच संयुक्त दायित्व गट अर्ज करु शकतात. योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी nlm.udhyamimitra या पोर्टलवर अर्ज करावा. विभागाकडून हा अर्ज तपासून बँकेकडे मंजुरीसाठी सादर केला जातो. बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिल्यावर राज्य समितीच्या शिफारसीसह केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल प्रकल्पासाठी स्वतःचे किंवा भाडेतत्वावरील जमीन आवश्यक आहे.
या कार्यशाळेमध्ये जवळपास 100 पशुसखी व पशुसंवर्धन विभागाशी सबंधित व्यक्ती उपस्थित होते.राष्ट्रीय पशुधन अभियान व्यतिरिक्त विभागाच्या राज्यस्तरीय योजना,जिल्हा स्रीय योजना,किसान क्रेडीट कार्ड,लम्पी चर्मरोगबाबत मार्गदर्शन व उपाययोजना तसेच वेळेवर उपस्थित झालेल्या विविध शंकाचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये उपायुक्त पशुसंवर्धन डॉ.वाय.एस.वंजारी यांनी, पशुसखींना गरजूपर्यंत पोहचून योजनांचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.
तसेच कार्यशाळेमध्ये डॉ. वरारकर, डॉ, कोरडे,डॉ,टेकाम, डॉ.लीना पाटील,डॉ,मदिकुंटावार,डॉ.मुकेश कापगते, यांनी मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे आयोजन डॉ.सुबोध नंदागवळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी बोंद्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांचे सहकार्याने केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. सुबोध नंदगवळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प. भंडारा यांनी करून राष्ट्रीय पशुधन अभियान व इतर योजनांची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व विवेक बोंद्रे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांनी मार्गदर्शन करून गावपातळीवर याचा प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले.