संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रा प बिडगाव , तरोडी (खु)ची निवडणूक येत्या काही महिन्यात प्रस्तावित आहे त्यामुळे सत्ता पक्षधारी तसेच गावातील काही इच्छुक उमेदवार हेतुपुरस्पर बिडगाव ग्रा प अंतर्गत येणाऱ्या गावातील वास्तव्यास असलेल्या कित्येक मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्याची प्रचिती कामठी तहसील कार्यालयच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयच्या वतीने मतदारांचे नावे वगळण्याचे नोटीस बजावले आहेत यावरून दिसून येते तेव्हा मतदान यादीतून मतदारांचे नावे वगळण्या आधी बीएलओ मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र कुठल्याही प्रकारची चौकशी न करता नावे वगळण्याचे नोटीस दिले आहेत तेव्हा या प्रकरणात योग्य ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा तसेच कोणत्याही मतदारांचे नावे मतदाराला विचारात घेतल्याशिवाय किंवा मतदाराला कळविल्याशिवाय वगळण्यात येऊ नये या मागणीसाठी आज कामठी तहसील कार्यालयात नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे यांच्या नेतृत्वात व कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या मुख्य उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार राजीव ब्रह्मनोटेला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले .
गट ग्रा प बिडगाव ,तरोडी खु अंतर्गत राहणाऱ्या लोकांना निवडणूक विभागामार्फत मतदान यादीतून नावे वगळण्याची नोटीस दिलेली आहेत.परंतु ती नोटीस संबंधित बीएलओ मार्फत मतदारा पर्यंत पोहोचली नसून बिडगाव ग्रा प मध्ये पडलेल्या होत्या व तसाचा तसा गठ्ठा उचलून पुन्हा तहसील कार्यालयात आणण्यात आला.निवडणूक विभागामार्फत कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मतदारांचे नाव मतदान यादीतून वगळण्याचे कटकारस्थान सुरू आहे.यासंदर्भात तरोडी (खु)येथील बीएलओ शुभांगी क्षीरसागर वगळता इतर कोणत्याही बी एल ओ ने नोटीस पोहोचविण्याची तसदी घेतलेली नाही तेव्हा नावे वगळण्याआधी गावातील मतदारांची चौकशी करून नावे वगळण्याचा निर्णय घ्यावा.यापूर्वी देखील निवडणूक विभागामार्फत मतदार यादीत घोळ करण्याचा प्रयत्न अनेक वेळा करण्यात आलेला आहे त्यामुळे यावेंळी अशा प्रकारे मतदार यादीत घोळ केल्याचा हेतू सिद्ध झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा ईशारा सुदधा दिलेल्या सामूहिक निवेदनातून दिला आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येत बिडगाववासी उपस्थित होते.