सावनेर :- सावनेर कडे येणाऱ्या अनेक मार्गांवर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस थांबत नसल्यामुळे जवाहर कन्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थिनी यांनी आज सावनेर आगार व्यवस्थापक गुणवंत तागडे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांना तक्रारीसंबंधी अवगत केले.
सावनेर हे शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे शहर असल्यामुळे ज्या ज्या गावात परिपूर्ण शिक्षणाच्या सोई नाहीत अशा गावावरून विद्यार्थी समोरील शिक्षणासाठी सावनेर येथे येऊन लाभ घेत असतात. तसेच संबंधित सर्व विद्यार्थी एसटी महामंडळाच्या बस ने ये-जा करीत असतात. विद्यार्थी त्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच रोख पैसे देऊन प्रवासी पास घेतात. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर पास योजनेमार्फत मोफत सुविधा पुरविल्या जाते. या योजनेमार्फत मिळणाऱ्या पासेस चे पैसे शासन एसटी महामंडळाला देत असते. एसटीला पासेस द्वारे त्यांचा महसूल प्राप्त होतो. तरीपण अनेक मार्गांवर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी बसच्या नोयोजित वेळेच्या आधी बसस्थानकावर पोहोचतात परंतु बसचे नियंत्रण चालक व वाहक यांच्या हाती असल्यामुळे बस थांबवायची की नाही ही बाब तेच ठरवतात. मग विद्यार्थी विद्यार्थिनीकडून प्राप्त महसूल हा फुकटच आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. बस न थांबल्यामुळे विद्यार्थी शाळा कॉलेजेस मध्ये कधी एक तास तर कधी अर्धा तास उशिरा पोहोचतात. पर्यायी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या प्रकारच्या तक्रारी इतक्यावरच थांबत नाही तर विद्यार्थी विद्यार्थ्यांना बस मधून उतरवून देणे, त्यांना सभ्य वागणूक न देणे, अपमानजनक शब्द वापरणे, तुच्छतेची वागणूक देणे. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेच्या येण्या जाण्याच्या वेळी बसेस नाही. काही बसेस चार साडेचार वाजताच निघून जातात. तर काही बसेस उशीरा पोहोचतात. पर्यायी विद्यार्थिनी रात्री साडेआठ तर कधी रात्री दहा वाजता सुद्धा घरी पोहोचलेल्या आहे. निदान त्यांच्या शाळेच्या येण्या जाण्याच्या वेळेवर अर्ध्या एक तासाच्या फरकाने बस असणेआवश्यक आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून ऐकायला मिळतात. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे योग्य काय? संवेदनशील मन असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींवर याचा काय परिणाम होईल याचाही विचार करणे गरजेचे आहे. चालक वाहकांनाही मुले मुली असतीलच. ते आपल्या पाल्यांना अशीच वागणूक देतात काय? गरीब ते सामान्य वर्गातील विद्यार्थी बाहेर गावावरून शिक्षणासाठी येथे येतात. अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परस्थिती बेताची असताना कसेबसे शिक्षण घेत आहे. निदान त्यांना शिक्षणाची ओढ तर आहे. त्यांच्या या इच्छेला चालना देणे आपले कर्तव्य आहे. चालक वाहक त्यांना सहकार्य तर करीत नाहीच उलट आपले कर्तव्य काय आहे हे सुद्धा विसरले आहे. हे विद्यार्थी येणाऱ्या काळात आजच्या आपल्या जागेवर बसून कर्तव्य पार पाडतील. हेच विद्यार्थी देश चालवतील. तेव्हा त्यांनी पण तुमच्यासारखेच कार्य करायचे काय? येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी चांगले देऊन जाऊ असा आदर्श बाळगावा.
वरील तक्रारीचे निवारण व्हावे यासंदर्भाचे पत्र आठवड्यापूर्वीच दिलेले होते. हेटी, भागीमहारी, भदी पिपळा, मंगसा, तेलगाव, मॉडर्न स्कुल, बोरगाव आदासा, वाघोडा, या ठिकाणाहून जास्त तक्रारी आहेत. वरील तक्रारिंचे निवारण न झाल्यामुळे प्रत्यक्ष जवाहर कन्या विद्यालयाचे पर्यवेक्षक राजू बांबल, शाळेचे शिक्षक गणेश निनावे, भीमराव लाडेकर, शिशिर ढाले व शाळेच्या अनेक विद्यार्थिनी यांनी आगार व्यवस्थापक यांना तक्रारी सांगितल्या. यावर तागडे यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून तक्रार निवारण होण्यासाठी सर्व चालक वाहक यांना कडक सूचना देण्यासाठी नोटीस काढा व विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. अशा सूचना दिल्या.
सिमा प्रमोद गोतमारे मुख्याध्यापिका, जवाहर कन्या विद्यालय सावनेर
गरिबांच्या मुली आमच्या शाळेत शिक्षण घेतात. अनेक पालकांच्या आर्थिक परिस्तिथी बरोबर नाही. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. त्यांच्यासाठी बस न थांबवणे किंवा असभ्य वागणूक देणे योग्य नाही. आधीच तर त्या गरीब विद्यार्थिनींकडे अनेक समस्या आहेत. परत आपण समस्यांची भर घालणे कितपत योग्य आहे?