– वाचनालय बंद केल्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; सहाय्यक ग्रंथपाला वर कार्यवाही करुन निलंबित करण्याची मागणी
– संविधानिक शैक्षणिक हक्क हिसकावून घेतल्या कारणाने पाचपावली पोलीस स्टेशन येथे तक्रार
नागपूर :- उत्तर नागपूरतील अशोक नगर येथील नागपूर महानगर पालिकेच्या डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय व श्रीमती उषारांणी महिला वाचनालय येथील सहाय्यक ग्रंथपालाने गुरुवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी आणि आज दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी कुठलेही कार्यालयीन आदेश नसतांना वाचनालय बंद केले, यामुळे वाचनालयातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक ग्रंथपालामुळे शैक्षणीक नुकसान झाल्याच्या आरोप करित आज वाचनालया समोर सहाय्यक ग्रंथपालावर कार्यवाही करुन निलंबित करण्याची मागणी केली तसेच संविधानिक शैक्षणिक हक्क हिसकावून घेतल्याप्रकरणी तसेच खोट्या आरोपात फसविण्याची धमकी दिल्या प्रकरणी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी पाचपावली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
अग्निशमन विभागातून बदलीहुन वाचनालय विभागात आलेल्या वाचनालयातील सहाय्यक ग्रंथपाल विजय खोब्रागडे याने पोळ्याच्या दिवशी मुलींचे वाचनालय दुपारी १ वाजता तर मुलांचे वाचनालय दुपारी ३ वाजता बंद केले. तसेच आज पूर्ण दिवस वाचनालय बंद केले असून यामुळे वाचनालयातील विद्यार्थ्यांच्या संविधानिक शैक्षणिक हक्क हिसकावून शैक्षणिक नुकसान केलेले आहे.
राज्यात विविध विभागात सद्या भरती प्रक्रिया सुरु आहे. यामुळे राज्यातील तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आहे. वाचनालय बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांचे संविधानिक शैक्षणिक हक्क सहाय्यक ग्रंथपालाने हिसकावून घेतलेले आहे.
समाजात दुर्दैवाने वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचाल तर वाचाल, या उक्तीनुसार विद्यार्थी, आबाल वृद्ध व एकूणच समाजातील सर्वच स्तरात वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टीने महापालिकेने वाचनालयाची निर्मिती केली. परंतु कामचुकार अधिकारी व वाचनालयातील सहाय्यक ग्रंथपालामुळे महापालिकेच्या उद्देशाला तडा जात आहे. या अगोदरही गैरप्रकारा मुळे अनेकदा येथील सहाय्यक ग्रंथपाल चर्चेत राहिलेला आहे. यावर मनपाच्या ग्रंथालय विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
सदर प्रकरणी आज शैक्षणिक हक्क हिसकावून घेतल्यामुळे आणि विद्यार्थ्यांना खोट्या आरोपात फसविण्याची धमकी दिल्या प्रकरणी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक ग्रंथपाला विरोधात पाचपावली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. यावेळी सहाय्यक ग्रंथपालावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे.