नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहा दिवसीय निवासी राष्ट्रीय एकता शिबिरात विद्यार्थ्यांनी देशाच्या जडणघडणीबाबत चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विविध राज्यातील जवळपास ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्या नियोजनात ही स्पर्धा पार पडली.
शब्दांपेक्षा चित्रे अधिक बोलकी असतात. एखाद्या गोष्टीचा मतदार चित्रांमधून शब्दांपेक्षा अधिक सहज समजून येतो. चित्रकला ही एक अद्भुत कला आहे. चित्रकलेमुळे आपणामध्ये सर्जनशीलता निर्माण होण्यास मदत होते. ही बाब हेरून राष्ट्रीय एकता शिबिरात दुपारच्या वेळी या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मध्य प्रदेश येथील इंद्रा देहरिया, सोनिका नायक, गुजरात येथील दिलीप पटेल, कोमल राठोड महाराष्ट्रातील यश पनवाल, पूजा खोटे, गजानन मिश्रा, नंदिनी भांडेकर, तामिळनाडू येथील सौमिया के., भूपती राजा एस., महाराष्ट्रातील सत्यजित चव्हाण, प्रेरणा धीरबस्सी, राजस्थान येथील देवेश दुबे, सोनिया देवरा, आसाम येथील राजदीप शर्मा, शिमोनी चौधरी, पश्चिम बंगाल येथील मंगला गोराय, अर्घ्य महाता, तेलंगाना येथील अंमोत राजेश, उड़े प्रणिता, केरला येथील विमल सजन जॉर्ज, मेधा वासुदेवन एम., महाराष्ट्र यश बडगुजर, गोवा येथील अवंतिका चवडे, रजनी रेड्डी, कर्नाटका येथील सुभाष कुपूही, रक्षीता एल., महाराष्ट्रातील तुषार झेंडे, राणी इंगळे आधी विद्यार्थ्यांचा समावेश होता.