विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

राज्यात सर्वाधिक जात वैधता प्रमाणपत्र नागपूर जिल्ह्यात निर्गमित

 नागपूर : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 अखेर मंडणगड योजनेप्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत जानेवारी अखेर राज्यात सर्वाधिक 3 हजार 484 जात वैधता प्रमाणपत्र नागपूर समितीने निर्गमित केले आहे. विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणा-या अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच उपरोक्त प्रवर्गातील अकरावी बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. त्यानुसार समितीच्या वतीने अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणीबाबत प्रस्ताव पाठविणेबाबत तसेच ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकरीता प्रस्ताव पाठविणेबाबत व जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये जाऊन समितीच्या वतीने ‘मंडणगड योजना’ प्रमाणे जात पडताळणीबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी विहीत वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांनी ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता त्वरीत अर्ज सादर करावे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज सादर केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी जात पडताळणीचे अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा व त्याची प्रत साक्षांकित कागदपत्रासह संबंधित महाविद्यालयाकडून सादर करावी.

सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्याचे पालक यांनी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे त्यांची अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2022 पर्यंत होती. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज अद्यापर्यंत सादर केले नाही, त्यांनी अर्ज 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत सबंधित महाविद्यालयात सादर करावे. सबंधित महाविद्यालयाने तत्काळ अर्ज जात पडताळणी समितीकडे सादर करावे.

अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज 1 फेब्रुवारी 2023 पासून 31 मार्च 2023 पर्यंत महाविद्यालयात जमा करावे, मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे, सर्व कागदपत्रे साक्षांकीत असावी, खोटी कागदपत्रे सादर करू नये याची पालकांनी व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अतिरीक्त जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात

Thu Feb 2 , 2023
नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आज करण्यात आले. मानकापूर येथील क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन 3 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे तीन हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.स्पर्धेचे उदघाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्या हस्ते करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com