संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा- राष्ट्रपती, आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

नागपूर :- जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.

येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समुहातील माडिया,कातकरी आणि कोलाम जमातींच्या प्रतिनिधींशी (आदिम जनजाती समूह) संवाद साधला. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यावेळी उपस्थित होते.

‘शाळेत जायला रस्ते नव्हते, दप्तर नसायचे, डोक्यावर कापडी पोतं पांघरून भर पावसाळ्यात शाळेत जावे लागायचे. पदोपदी संघर्ष होता. दर मजल करत यश संपादन करून शिक्षिका, राज्यपाल आणि देशाची राष्ट्रपती झाले’, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो ऐकतांना सारेच उपस्थित भारावले होते. आदिवासींनी न्यूनगंड न बाळगता शालेय व उच्च शिक्षण घेतले पाहिजे. उच्चपदे भूषवून आपल्या समाज बांधवांनाही विकासाच्या प्रवाहात पुढे नेले पाहिजे, असे उद्बोधक मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.

पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर देशातील जवळपास सर्वच राज्यांना भेटी दिल्या. देशात एकूण ७०० आदिवासी जमाती असून यातील ७५ जमाती या अतिमागास असल्याचे चित्रही निदर्शनास आले. ७०० जमातींच्या १ हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. या भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनांनी आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत. शासनाच्या मदतीसोबतच आदिवासींनी पुढाकार घेत आपल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. शासनानेही आदिवासींची सामाजिक स्थिती समजुन घेत त्यानुसार वेळोवेळी योजना व उपक्रमांमध्ये संयुक्तिक बदल करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्र शासन आदिवासी कल्याणाच्या योजना उत्तम प्रकारे राबवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

न्यूनगंड हा आदिवासींच्या शिक्षणापुढील सर्वात मोठा अडसर असल्याचे अधोरेखित करतांना स्थानिक आदिवासी शिक्षित मुलांकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जावे, अशा सूचना राष्ट्रपतींनी केल्या. याविषयी त्यांनी शिक्षिका असतांना राबविलेले आनंददायी शिक्षण उपक्रमांबाबत अनुभव कथन केले.

आदिवासी प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद

उपस्थित आदिवासी प्रतिनिधीपैकी तिघांनी प्रातिनिधीक स्वरुपात राष्ट्रपतींशी संवाद साधला. सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील पहिले आदिवासी डॉक्टर असलेले डॉ.कन्ना मडावी यांनी, माडिया जमातीचे प्रतिनिधी म्हणून विचार व्यक्त केले. आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. विकास करतांना आदिवासींचा प्राण असणारी जंगले वाचली पाहिजेत, आदिवासी शाळांमध्ये पुरेशे शिक्षक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम जमातीचे प्रतिनिधी डॉ.गंगाधर आत्राम यांनी आदिवासींच्या रोजगाराचा मुद्दा मांडला. रोजगाराअभावी बालवयातच आदिवासींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.आदिवासींना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळाल्यास त्यांची मुले शिक्षण घेऊ शकतील व प्रगती करू शकतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कातकरी जमातीच्या प्रतिनिधी डॉ.कौशिका भोये यांनी आदिवासींसाठी मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, अशा भावना व्यक्त केल्या. नीट (NEET) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या १० आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. राज्य शासन आदिवासी कल्याणासाठी राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली.

तत्पूर्वी, रेला पारंपरिक आदिवासी नृत्याचे राष्ट्रपतींसमोर उत्तम सादरीकरण झाले. पारंपरिक वेशातील आदिवासी बांधव आणि त्यांनी वाद्यांवर धरलेला ठेका बघुन राष्ट्रपतींसह उपस्थितांनी दाद दिली. यावेळी माडिया, कोलाम जमातींद्वारा निर्मित वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्पांच्या दालनास राष्ट्रपतींनी भेट दिली. याठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या हस्तशिल्पांची माहिती त्यांनी जाणून घेतली व कारागिरांची आस्थेने चौकशी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत

Thu Jul 6 , 2023
मुंबई :– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. भारतीय सैन्य दलाच्या तीनही दलांच्या वतीने यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली.            नागपूर येथील विविध कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती मुर्मू यांचे दुपारी येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com