मुंबई :- काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी तीव्र निषेध केला आहे. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भिती पोटीच इंग्रजांना शरण गेले. घाबरल्यामुळेच सावरकरांनी माफी नाम्यावर स्वाक्षरी केली व त्यांनी एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला असा आरोप गांधी यांनी केला.
इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारताचा सुपूत्र म्हटलेले असून सावरकरांनी ब्रिटिशांशी धाडसी युद्ध केले व त्याची नोंद इतिहासात होईल असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात दोन वेळा जन्मठेपेची काळ्या-पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आलेले होती, हा इतिहास जाणून न घेता राहूल गांधी यांनी कुठलेही वक्तव्य करणे शोभत नाही. राहूल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचे पत्र वाचलेले दिसत नाही असे अरूण जोशी म्हणाले. राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत सर्व बाबी योग्य प्रकारे समजावून घेणे आवश्यक आहे. अपूर्या माहितीच्या आधारे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा हिंदू महासभा जाहीर निषेध करीत असून त्यांनी आपले शब्द मागे घेऊन जाहीर माफी मागावी व त्यासाठी देशातील हिंदू बांधवांनी ठिकठिकाणी जाहीर निषेध करावा असे आवाहन सूद्धा अरूण जोशी यांनी यावेळी केले आहे.