नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने आरोग्यास धोकादायक अशा खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध कडक कारवाईला सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाद्वारे आरोग्यास धोकादायक अशा तीन खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध प्रथम खबर अहवाल अर्थात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मनपाच्या हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या खसरा क्रमांक ३६, प्लॉट क्रमांक ७३ व ७४, धांडे ले आऊट मौजा हुडकेश्वर यांच्या मालकाविरुद्ध सहायक आयुक्त नरेंद्र बावणकर यांच्यामार्फत हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तर आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या माँ बमलेश्वरी नगर, पाहुने ले आउट, यांच्या मालकाविरुद्ध मनपातर्फे बबलू चावरिया यांच्या मार्फत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिका घनकचरा विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाच्या हनुमाननगर झोन क्र. 03 अंतर्गत येणाऱ्या प्रभाग 29 मधील मौजा हुडकेश्वर खसरा क्र. 36 धांडे लेआऊट, राधा कृष्ण मंदिर शनी धाम मंदीर येथील रीकाम्या भुखंड क्रमांक 73 व 74 मालकी राजु अखडुजी धांडे यांच्या जागेवर पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे, गवत इत्यादी वाढलेले आढळून आले. त्याकरिता भूखंड धारक राजु अखडुजी धांडे यांना 08 ऑगस्टला नोटीसद्वारे हे अवगत करण्यात आले. परंतु अद्याप संबंधीत भुखंड धारक यांनी या नोटीसची दखल घेतलेली नसून, त्यांच्या भुखंडामधील पाण्याची निकासी करून भुखंडामधील झाडी-झुडपे, गवत इत्यादीची साफ सफाई केलेली नाही. सदर भुखंडावर झाडी-झुडपे, गवत कचरा इत्यादी साचुन असल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्यापासुन त्रास सहन करावा लागत आहे. भुखंडावरील कचरा/घानीमुळे परीसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच भुखंडावर जमा असलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढुन त्यापासून परिसरातील नागरिकांना किटकजन्य (डेंग्यू, मलेरीया) आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत भुखंडधारक यांना संपूर्ण बाबीचे ज्ञान असून, सुध्दा कुठलीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे भुखंड धारक सदरचे कृत्य जाणीवपुर्वक करत असल्याचे निर्देशनात आल्यामुळे मालकावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
याशिवाय आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या माँ बमलेश्वरी नगर, पाहुने ले आउट येथील भूखंड क्रमांक २८चे मालक लक्ष्मी गौर व भूखंड क्रमांक 21,२२ चे मालक सुरेश बागडे यांच्या खुल्या जागेवर पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे, गवत इत्यादी वाढलेले आढळून आले. भुखंडावरील कचरा/घानीमुळे परीसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच भुखंडावर जमा असलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढुन त्यापासून परिसरातील नागरिकांना किटकजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
मनपाने आरोग्यास धोकादायक खुल्या भुखंडाच्या मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सुरुवात केली असून, नागरिकांनी आपल्या खुल्या भूखंडावर स्वच्छता राखावी असे आवाहन मनापाद्वारे करण्यात आले आहे.