– जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज (रविवारी) जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदने देतानाच वैद्यकीय, रस्ते सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण कल्पनाही मांडल्या.
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह मोठी गर्दी केली. सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित होते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश होता. नवीन रस्ते, अनुकंपा तत्वावरील नोकरी, शाळेतील प्रवेश, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली.
यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांच्या संदर्भातील मागण्या घेऊन याठिकाणी आले.
विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. जागेच्या प्रश्नासंदर्भातील निवेदनेही त्यांनी स्वीकारली. सामाजिक, साहित्यिक, धार्मिक तसेच अध्यात्माशी संबंधित संस्थांनीही ना. गडकरी यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या.
नाविन्यपूर्ण कल्पना
एका तरुणाने अल्कोहोल आणि ड्रग्स टेस्टिंग उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाची उपयुक्तता त्याने ना. गडकरी यांना समजावून सांगितली. रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी काही तरुणांनी नवीन उपाययोजना सूचविल्या. ज्या वाहनांच्या मागच्या भागाला लाईट्सची व्यवस्था नसते अशा वाहनांवर विशिष्ट प्रकारच्या रेडियमच्या प्लेट्स लावल्याने अपघात रोखता येणे शक्य होईल, अशी कल्पना काहींनी सुचवली.
एका संस्थेतील तरुणांनी एक क्युआर कोड तयार केला. यामध्ये वाहन चालकाच्या मोबाईलमधले सर्व नंबर असतील. जेणेकरून त्या वाहनाचा अपघात झाल्यास क्यूआर कोड स्कॅन करून नातेवाईकांना अपघाताची माहिती देता येईल आणि अपघाताचे स्थळही सांगता येईल. ना. गडकरी यांनी या सर्व कल्पनांचे कौतुक केले आणि संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास दिला.