●रोज उत्कृष्ट कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवा,व्यवस्थापकीय संचालक हर्डीकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
●नागपूर मेट्रोचा ११ वा स्थापना दिन मेट्रो भवन येथे आज साजरा झाला
नागपूर :- नागपूर मेट्रोचा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी, कुठल्याही पदावर असला तरीही, या संस्थेचा अम्बॅसॅडर आहे. त्यामुळे समाजात वावरताना प्रत्येक अधिकाऱ्याने व कर्मचाऱ्याने त्या दृष्टीने कार्य करावे. महा मेट्रो नागपूर चे मूल्य, दिशा आणि कार्यपद्धती हे प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता मार्गदर्शक तत्वे आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाने हे आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले. नागपूर मेट्रोच्या ११ स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
१० वर्षाचा महत्वपुर्ण टप्पा पार करत महा मेट्रो नागपूरने आज ११ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मेट्रो भवन येथे स्थापना दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात संचालक (रोलिंग स्टॉक अँड सिस्टीम) विनोद अग्रवाल, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लांनिंग अँड ऑपरेशन) अनिलकुमार कोकाटे, संचालक (वित्त) हरेंद्र पांडे आणि संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नागपूर मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नागपूर मेट्रो प्रकल्पाची निर्मिती पुढील १०० वर्षांची गरज लक्षात घेत झाली असली तरीही याचे मार्गदर्शक तत्व मात्र नेहमीच कायम राहतील. या तत्वांना अनुसरून सर्वांनी रोज उत्कृष्ट काम करणे अपेक्षित आहे. काम करताना या करता प्रत्येकाने इतरांशी नाही तर स्वतःशीच स्पर्धा करावी. प्रत्येक दिवस हा नवीन असून काल पेक्षा आज चांगले काम कसे करता येईल याचा विचार सर्वांनीच करायला हवा. महा मेट्रोचे पदचिन्ह राज्यात सर्वत्र जाणवत असून येत्या काळात राज्याच्या बाहेर किंवा अगदी विदेशात देखील महा मेट्रोचे अस्तित्व जाणवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेट्रोचे कर्मचारी म्हणून आपण शहराच्या नागरिकांना कशी सेवा देतो यावरून आपले मूल्यमापन होणार आहे. म्हणूनच नागरिकांना मिळणारी सेवा कशी चांगली असेल आणि यात नावीन्य कसे असेल याचा विचार प्रत्येक कर्मचाऱ्यांनी करावा असे आवाहन देखील हर्डीकर यांनी केले. वर्धापन दिनाच्या सर्वच मेट्रो कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना, स्थापना दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचे तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागपूर मेट्रो कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले.
या आधी हर्डीकर आणि नागपूर मेट्रोच्या संचालकांनी दीप प्रज्वलन करत या स्थापना दिन सोहळ्याचे विधिवत उदघाटन केले. मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील महा मेट्रो तर्फे कर्मचाऱ्यांकरता विविध क्रीडा तसेच इतर स्पर्धांच्या विजेत्यांचे तसेच उप-विजेत्यांचे पुरस्कार देत सत्कार करण्यात आला. महा मेट्रो तर्फे क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस या खेळांशिवाय पेंटिंग, रांगोळी तसेच आर्ट अँड क्राफ्ट अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले होते. या सर्व स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला एकेरी व दुहेरी, ज्येष्ठ वयोगटातील कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. या सोबतच संपूर्ण वर्ष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रकल्प आणि संचालन विभागाच्य कर्मचाऱ्यांना देखील पुरस्कृत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.