नागपुर – आज नागपुर जिल्हा व शहरातील ओला व उबरच्या बाईक टॅक्सी मालक-चालकांवर RTO तर्फे सुरू असलेली दंडात्मक कार्यवाही थांबविण्याबाबत केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांना आमदार समीरजी मेघे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी सोबत भाजपा युवा मोर्चा नागपुर जिल्हाध्यक्ष आदर्श पटले उपस्थित होते.
देशातील अनेक राज्यांनी मान्यता प्रदान केलेल्या ओला व उबरच्या बाईक टॅक्सी सर्व्हिसेसला महाराष्ट्र राज्यात अनुमती नसल्याची बाब दर्शवून दिनांक 14 फेब्रुवारी 2022 पासून या टॅक्सी मालक व चालकांवर परिवहन (RTO) विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे सर्व प्रभावीत मालक चालक त्रस्त झालेले आहेत. याबाबत परिवहन (RTO) विभागास त्यांनी विचारणा केली असता राज्य शासनाची अनुमती नसल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री-बेरात्री, पाऊस, थंडी, ऊन-वारा अशा कोणत्याही कठीण प्रसंगी बाईक टॅक्सीची सेवा तत्परतेने देणारे प्रभावीत लोक आज हवालदील झालेले आहेत. नागपूर जिल्हयात आताच्या स्थितीत जवळपास एकुण 1500 ते 2000 बाईक टॅक्सी आहेत. शासनाच्या व पर्यायाने परिवहन (RTO) विभागाने सुरू केलेल्या या कार्यवाहीमुळे ऐवढया मोठया संख्येने मालक-चालक हे बेरोजगार होणार असल्यामुळे त्यांचेवर अवलंबुन असलेली कुटुंबे आर्थीक अडचणीत सापडणार आहे. त्याचप्रमाणे गरजु नागरीकांना सुध्दा आवश्यक वेळी व कठीण प्रसंगी सहज उपलब्ध होणारी बाईक टॅक्सीच्या सेवा मिळणार नाही.
तेंव्हा कृपया अचानकपणे उद्भवलेल्या या समस्येवर मार्ग निघून राज्यात व पर्यायाने संपूर्ण नागपूर जिल्हयातील परिवहन, वाहतुक सुविधा व सोयी नागरीकांसाठी सहज व सोपी होण्याचे दृष्टीने बाईक टॅक्सी चालक-मालक यांचेवर सुरू असलेली दंडात्मक कार्यवाही थांबविण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केलेली आहे. तरी सदरची कार्यवाही थांबविण्याबाबत आपले स्तरावरून शिफारस व्हावी, अशी विनंती पत्राद्वारे नितीन गडकरी यांना करण्यात आली.