मुंबई :- केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील संघटना बांधणीसाठी भाजपा, महाराष्ट्रतर्फे लोकसभा प्रवास योजना आजपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मुंबईत दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि प्रवक्ते गणेश हाके उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात चालू आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल.
ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. नारायण राणे (सांगली), रावसाहेब दानवे (लातूर व मावळ), डॉ. भागवत कराड (परभणी व धुळे), डॉ. भारती पवार (नाशिक) आणि कपिल पाटील (रावेर आणि सोलापूर) या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनात इतर लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बळकटीचे काम होईल. केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील व त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरुपाचे कार्यक्रम असतील. ही योजना आज सुरू झाली आहे.
त्यांनी सांगितले की, राज्याच्या लोकसभा प्रवास योजनेचे मुख्य संयोजक किशोर काळकर आहेत, केंद्रीय लोकसभा प्रवास योजनेचे प्रभारी माजी मंत्री बाळा भेगडे आहेत.
ते म्हणाले की, राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे. त्याची जबाबदारी आ. श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आली आहे.
भाजपाचे नंदूरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
त्यांनी सांगितले की, राज्यातील ७७५१ ग्रामपंचायती निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामांकनाची पद्धती लागू केली होती. पण गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पन्नास टक्केच अर्ज दाखल झाले. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास परवानगी द्यावी व अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती आपण राज्य निवडणूक आयोगाला केली होती. आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी आज दिली असून अर्ज भरण्याची मुदत साडेतीन तास वाढविली आहे. आपण राज्य निवडणूक आयोगाचा आभारी आहोत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र कोणकोणत्या विभागात मागे पडला, यावर श्वेत पत्रिका काढावी, अशी आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे मागणी आहे. प्रत्येक विभागाचा अहवाल मांडला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल, असे ते म्हणाले