– महाराष्ट्राचा संघ जाहीर
नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परीषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा सॉफ्टबॉल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल (17 वर्षे मुले व मुली) क्रीडा स्पर्धा सन 2023-24 या स्पर्धेचे आयोजन दि. 16 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती, नागपूर या 8 विभागातून एकूण 288 खेळाडूंनी (मुले व मुली) सहभाग घेतला.
17 वर्ष वयोगटातील पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये मुलांच्या संघातून प्रथम क्रमांक कोल्हापूर विभाग, व्दितीय क्रमांक छत्रपती संभाजी नगर, तृतिय क्रमांक नागपूर विभाग तसेच मुलींच्या संघामध्ये प्रथम क्रमांक नाशिक विभाग, व्दितीय क्रमांक कोल्हापूर विभाग, तृतिय क्रमांक नागपूर विभागाने पटकावला.
निवड चाचणीकरीता महाराष्ट्र राज्यातील 80 खेळाडु (मुले व मुली) स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी किशोर चौधरी, पियुष अंबुलकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडधे यांनी काम पाहीले.
या स्पर्धेचा समारोप 19 ऑक्टोबरला माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच क्रीडा व युवक सेवेचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी पियुष अंबुलकर, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष केतन ठाकरे तसेच विकास येवतीकर, नुतन भारत युवक संघाचे अध्यक्ष रमेश बक्षी यांचे उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी धात्रक यांनी केले तर सूत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले.