– नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात लाभार्थी महिलांनी व्यक्त केला आनंद
– महिला लाभार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन
नागपूर :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या निधीमुळे घरी सुरू केलेल्या होजिअरी व्यवसायाला आता पुढे नेता येईल. या योजनेच्या लाभातील मिळालेले ३००० रुपये आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत असे सांगत नागपूर येथील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभधारक रुहअफजा यांनी शासनाला धन्यवाद दिले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील शानदार उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्यातील निवडक महिलांना साक्षीदार होता यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने येथील नवीन जिल्हानियोजन सभागृहात विशेष समारंभ आयोजित केला होता. या औचित्याने लाभधारक म्हणून साधलेल्या संवादात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व जिल्ह्यातील महिलांशी संवाद अशा वेगळ्या कार्यक्रमासाठी महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी भारती मानकर आदी यावेळी उपस्थित होते.
‘१४ ऑगस्ट ला ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनें’तर्गत दोन महिन्यांचा निधी बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज माझ्या मोबाईलवर धडकला तसा माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. माझा खर्च आता मी स्वतः भागू शकेल आणि माझ्या शिवणकामाच्या छोटया उद्योगालाही गती देऊ शकेल,अशा भावना सदर छावनी परिसरातील रुहअफजा यांनी व्यक्त केल्या.
दीप प्रज्वलनाचा मान महिलांना
महिला सक्षमीकरणाचा या आगळ्या सोहळ्याच्या दीप प्रज्ज्वलनासाठी आयुक्त चौधरी व जिल्हाधिकारी इटनकर यांनी उपस्थित लाभधारक महिलांना बोलावून त्यांना पुढे केले. हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले.
थेट प्रक्षेपणाची सुविधा
पुणे येथे पार पडलेल्या संपूर्ण शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आल्याने महिलांना प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. यावेळी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थी महिलांचे जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र निहाय प्रातिनिधिकरित्या अभिनंदनही यावेळी करण्यात आले.
लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान
हिंगणा तहसिलच्या खडका परिसरातील रजनी सहारे भावूक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.’मला वडील नाहीत. हात मजुरी करून घर चालवते आईचीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या लाडक्या भावाच्या या मदतीने या योजनेअंतर्गत निधी मिळाल्याने आता आत्मविश्वास मिळाला’ असे त्या म्हणल्या.
कामठी तालुक्यातील मु. चिचोली पो. पिपला येथील अत्रीबाई हिवनाती या विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांना सतत दवाखान्याचा खर्च असतो त्यासाठी मुलावर अवलंबून रहावे लागते. आता या योजनेच्या लाभामुळे मुलावर अवलंबून न राहता स्वतःचे उपचार घेता येईल, अशा भावना व्यक्त करीत त्यांनी राज्यशासनाचे आभार मानले.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत’ जिल्ह्यात ५ लाख ७९ हजार ७८६ अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र अर्जांची संख्या ५ लाख ६८ हजार ६६४ आहे. यापैकी महानगर पालिका क्षेत्रातून २ लाख २१ हजार ८२८ अर्ज प्राप्त झाले असून यातील पात्र अर्जांची संख्या २ लाख १७ हजार ३६४ आहे.