नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाद्वारे शहरातील विविध भागात लावलेले आकाश चिन्ह (होर्डिंग) व ज्यावर आकाश चिन्हे उभारले आहे. अशा स्ट्रक्चरच्या सर्वेक्षणाला बुधवार (ता.१५) पासून सुरुवात झालेली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात सर्वेक्षण करण्यासाठी आकाशचिन्ह परवाना विभागाद्वारे दोन पथक गठित करण्यात आले आहेत. प्रत्येक पथकामध्ये प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पथकाकडून सर्वेक्षणात आकाशचिन्ह हे अनुमती दिलेल्या आकारा एवढेच आहे की कसे? आकाश चिन्ह अनुमती अन्वये आहे किंवा बिनाअनुमतीचे आहे तसेच आकाशचिन्हाकरिता उभारलेल्या स्ट्रक्चरच्या स्थिरतेबाबत स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे किंवा कसे? या बाबत सर्वेक्षणात माहिती गोळा करण्यात येत आहे. अभिकरणांनी विनाअनुमतीने आकाशचिन्ह उभारले किंवा अनुमती देतांना ज्या अटी व शर्ती अन्वये बंधने घातलेली आहेत त्या बंधनाचे उल्लंघन केलेले आहे, असे सर्वेक्षाणामध्ये आढळल्यास अशा अभिकरणांवर नियमान्वये त्वरीत कार्यवाही करण्यात येणार आहे. १५ दिवसांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात खासगी मालमत्तेवर आकाशचिन्ह करीता स्ट्रक्चर उभारून आकाशचिन्ह प्रदर्शित करण्याची सक्षम प्राधिकरणांनी अनुमती प्रदान करून १०५३ आकशचिन्ह उभारलेली आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम २४४ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (आकाशचिन्ह व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण) नियम २०२२ च्या तरतूदी अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आकाशचिन्ह करीता स्ट्रक्चर उभारून आकाशचिन्ह प्रदर्शित करण्याची अनुमती मनपा सक्षम प्राधिकरणाकडून देण्यात येते. उक्त तरतुदी अंतर्गत अनुमती देताना जवळपास १३ दस्ताऐवज सादर करून घेऊन दस्ताऐंवजाचे तपासणी व मौका चौकशी करून अनुमती देण्यात येते. आकाशचिन्ह करीता आवश्यक स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरल इंजीनिअर कडून डिझाईन करून घेतल्या प्रमाणेच उभारण्यात आल्याचे व उभारलेल्या स्ट्रक्चरची स्टॅबीलीटी हे स्ट्रक्चरल इंजीनियर मार्फत प्रमाणीत करून घेतली जाते.