मुंबई :- मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. वांद्रे टर्मिन्सवर सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5.56 वाजता वांद्रे टर्मिन्सच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झाली. वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 22921 वांद्रे गोरखपूर एक्सप्रेस ही लागलेली होती. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रेनमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली. त्यात 9 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यात 2 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे बोललं जात आहे.
जखमींची नावे
शबीर अब्दुल रेहमान – पुरुष (४०) परमेश्वर सुखधर गुप्ता – पुरुष (२८) रविंद्र हरिह चुमा – पुरुष (३०) रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजामती – पुरुष (२९) संजय तिलकराम कांगय – पुरुष (२७) दिव्यांशू योगेंद्र यादव – पुरुष (१८) मोहम्मद शरीफ शेख – पुरुष (२५) इंद्रजित सहानी – पुरुष (१९) नूर मोहम्मद शेख – पुरुष (१८)
भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवाशी साधारण 18 ते 30 वयोगटातील आहेत. यातील इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे.