नागपूर : महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 चे आयोजन महाराष्ट्रात प्रथमच 1 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत एकूण 39 क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, मुंबई व नागपूर संत्रानगरीमध्ये या स्पर्धाचे आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीष महाजन, विरोधी पक्षनेते तथा अध्यक्ष, महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक संघटना अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या अनुषंगाने विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथून क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन आज करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव, रंजितसिंग देवोल,तसेच क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, विजय निश्वर, दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थी संघटनेचे कामदार, आपटे, जिवानी, डॉ. सुनिल भोतमांगे तसेच डॉ. जयप्रकाश दुबळे, माजी सहसंचालक, क्रीडा विभाग, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचे प्रमुख उपस्थितीत क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. त्याप्रसंगी रंजितसिंग देवोल यांनी महाराष्ट्रात होवू घातलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे वेळी केशवनगर शाळेचे विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करुन महाराष्ट्रातील संस्कृतीची आठवण करून दिली. लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनात खेळाडूंनी सुंदर असे स्केटींगचे दर्शन करून या क्रीडा ज्योतीला सलामी दिली. तसेच पोलीस विभाग व भोसला मिलीटरी स्कूलचे बँड पथक तसेच एन.सी.सी. अश्वपथक, प्रहार मिलीटरी स्कूलचे बँड पथक, तिडके विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा ज्योतीची विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथून पुढे शहरामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू संजना जोशी तसेच जयंत दुबळे, चेतन महाडीक, प्रथमेश वाघ, नयन सरडे, काजल गणवीर यांच्याद्वारे दिक्षाभूमी या ऐतिहासिक स्थळापर्यंत नेण्यात आली. आणि पुढे समृध्दी महामार्गाने क्रीडा ज्योत पुणे येथे रवाना झाली.
क्रीडा ज्योत रॅलीत खेळाडू, नागरीक, क्रीडा प्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.