चंद्रपूर :- हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपूर मनपातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने मनपा अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी रॅलीत उपस्थिती दर्शविली.
मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथुन मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त यांनी सांगितले की,घरोघरी तिरंगा अभियानात ३० हजार ध्वजांचे वाटप आतापर्यंत शहरात करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी,प्रत्येक दुकानात तिरंगा लागावा हीच अपेक्षा असुन प्रत्येकाने एक राष्ट्र संकल्पनेला महत्व द्यावे.
प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ते परत सावरकर चौक ते प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट ते अंचलेश्वर गेट ते बागला चौक ते अंचलेश्वर गेट असे मार्गक्रमण करीत मनपा कार्यालय गांधी चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.रॅलीत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी,उपद्रव शोध पथक तसेच यांत्रिकी विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाले होते.
आयुक्त विपीन पालीवाल,जिल्हा नगर विकास सहआयुक्त विद्या गायकवाड, अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांनी दुचाकीवर स्वार होत रॅलीत सहभाग नोंदविला. याप्रसंगी भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ घेण्यात आली. तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले.विविध वाहनांना तिरंगा रथ बनविण्यात आले होते.
भारतमाता तसेच विविध महात्म्यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थी उपस्थीत होते. उपस्थितांनी उपलब्ध कॅनवासवर जय हिंद,भारत माता कि जय लिहुन अभियानास समर्थन दर्शविले याप्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकर,नगर रचनाकार सुनील दहीकर,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे,संतोष गर्गेलवार,डॉ.नयना उत्तरवार,रवींद्र कळंबे,अतुल टिकले,आशिष भारती,डॉ.अमोल शेळके,नागेश नित,रफीक शेख,सोनू थुल,भूपेश गोठे,संजय टिकले,भुषण ठाकरे,डॉ.अश्विनी भारत,आशिष जीवतोडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.