योजनांच्या लाभाकरिता झोन कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी
नागपूर :- जनकल्याणकारी विविध योजनांचा सर्वसामान्यांना सहजरित्या लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे ‘जत्रा शासकीय योजनांची- सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान सुरू केले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे बुधवार ३ मे पासून दहाही झोन कार्यालयातून शहरात योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. बुधवारी (ता.३) अभियान अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. शासनाच्या विविध योजनांच्या लाभाकरिता झोन कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली.
१५ जून पर्यंत दर बुधवार आणि गुरूवारी मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरू नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोन कार्यालयात अभियानाची अंमलबलावणी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत झोन कार्यालयांमध्ये समाज विकास विभाग, आरोग्य विभागाच्या योजनासह इतर विभागाच्या योजना, विविध दाखले / प्रमाणपत्र / आधार नोंदणी, अद्ययावत करणे इ. सोयी सुविधा नागरिकांना पुरविण्यात येत आहेत.
मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या नेतृत्वात विविध विभागांचे अधिकारी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या योजना मनपाच्या दहाही झोन अंतर्गत राबवून मनपा हद्दीत येणाऱ्या खाजगी व शासकीय शाळांमध्ये शिबीरांचे आयोजन करण्यात करण्यात येणार आहे.
मनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये आधार नोंदणी, विविध दाखले, आरोग्य विभागाच्या योजना आदींबाबत यंत्रणा कार्यरत करण्यात आलेली आहे. या यंत्रणेचा नागरिकांकडूनही लाभ घेतला जात आहे. दर बुधवार आणि गुरूवारी होणा-या कल्याणकारी योजनांच्या या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.